पथदिवे सुरु करा अन्यथा आत्मदहन; माजी नगरसेवक तायगा शिंदे यांचा इशारा अहमदनगर | नगर सह्याद्री टीव्ही सेंटर ते गुलमोहर रोड चौकापर्यंत बसवलेल्...
पथदिवे सुरु करा अन्यथा आत्मदहन; माजी नगरसेवक तायगा शिंदे यांचा इशारा
टीव्ही सेंटर ते गुलमोहर रोड चौकापर्यंत बसवलेल्या विद्यूत पोलवर अद्याप दिवे लावले नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य आहे. वारंवार पाठपुरावा करूनही महापालिका दखल घेत नसल्याने माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी या खांबांवर मशाल व टेंभे लावून आंदोलन केले. गणेशोत्सवापूर्वी खासगी कंपनीने पथदिवे न बसवल्यास नगरसेविका सोनाबाई शिंदे यांच्या निधीतून तात्काळ हे पथदिवे बसवावेत. पथदिवे न बसवल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अज्ञातस्थळी आत्मदहन करण्याचा इशारा माजी नगरसेवक शिंदे यांनी दिला आहे.महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून प्रोफेसर कॉलनी चौक रस्त्यावर पथदिव्यांसाठी खांब बसवले आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून हे खांब उभे आहेत; मात्र त्यावर पथदिवे न बसवल्याने संपूर्ण रस्त्यावर अंधार असतो. सतत छोटे मोठे अपघात होत आहेत. गणेशोत्सवाला अवघे चार दिवस राहिलेले आहेत. उपनगरमधील गणेश विसर्जन मिरवणूक याच मार्गावरून काढली जाते. नागरिक पथदिवे बसवण्याती वारंवार मागणी करत आहेत. तरीही अधिकारी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अधिकार्यांचे लक्ष वेधण्यासाठी या खांबांवर मशाल व टेंभे लावून आंदोलन केले. महापालिकेने खासगी कंपनीकडून तात्काळ पथदिवे बसवून घ्यावेत.
सतत गर्दी असणारा चौक
प्रोफेसर कॉलनी चौकात संध्याकाळी मोठी गर्दी असते. विविध वस्तू खरेदीसाठी लोक येथे येतात. भाजीवालेही याच रस्त्यावर असल्याने ही गर्दी वाढते. रात्रीच्यावेळी छेडछाड, महिलांच्या अंगावरील दागीने पळविणे, असे प्रकार गेल्या काही दिवसात शहरात वाढले आहेत. याचा विचार करून महापालिकेने तातडीने येथे पथदिवे बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
खासगी कंपनी दिवे बसवत नसेल, तर नगरसेविका शिंदे यांच्या निधीतून हे दिवे बसवावेत. मात्र, गणेशोत्सवापूर्वी पथदिवे न बसवल्यास कोणत्याही क्षणी अज्ञातस्थळी आत्मदहन आंदोलन केले जाईल, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.आंदोलनात नगरसेविका शिंदे, सतीश शिंदे, संतोष लोखंडे, प्रशांत वाघ, मनीष शिंदे, प्रमोद कुलकर्णी, ओंकार आरडे, कुणाल पडजाते, डॉ. म्हस्के, नीलेश चिप्पा, सागर शिंदे, गणेश शिंदे, शुभम शिंदे, आदित्य शिंदे आदींसह नागरिक सहभागी झाले होते.
COMMENTS