पारनेर | नगर सह्याद्री पारधी समाजाच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील दत्तात्रेय गवळी या प्राथमिक...
पारनेर | नगर सह्याद्री
पारधी समाजाच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील दत्तात्रेय गवळी या प्राथमिक शिक्षकांने चंगच बांधला असून त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेपासून ते शालेय शिक्षण व ज्ञानदानाचे काम मनोभावे करताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर स्वतःच्या हाताने पारधी समाजातील मुलांना आंघोळ घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाल्याने शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे कामाचे विशेष कौतुक केले जात आहे.
मूळचे पारनेर तालुक्यातील बाबुर्डी या गावचे रहिवासी असलेले दत्तात्रय गवळी सर यांना सामाजिक कार्याची खूप आवड आहे. प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत विद्यार्थ्यांना बाल वयातच संस्काराचे धडे देतात. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे काम दत्तात्रेय गवळी सर व गणेश खामकर सर करत असल्याची भावना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप सरोदे व उपाध्यक्ष सुरास सरोदे यांनी व्यक्त केली. आजचे विद्यार्थी हेच उद्याच्या राष्ट्र घडविण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत अशी भावना ठेवून बालवयातच संस्कारक्षम पिढी घडवण्याचे काम दत्तात्रय गवळी सर यांच्या माध्यमातून होत असल्याची भावना गावचे सरपंच सुर्यजीत पवार यांनी व्यक्त केली आहे.
अंघोळ घालताना फोटो सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर पारधी समाजातील मुलांना स्वतः साबण लावून आंघोळ घालत असलेला फोटो पाहून दत्तात्रय गवळी सरांच्या कामाबद्दल सरोदे मळा गावातील ग्रामस्थ तसेच तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे केंद्रप्रमुख बबन वेताळ साहेब ,प्रभारी केंद्रप्रमुख भाऊसाहेब जगताप, शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण गांगड यांनी कौतुक व समाधान व्यक्त केले.
रायगड जिल्ह्यातील महाड येथे पूर परिस्थिती निर्माण झाली होती व तळीये गावामध्ये खूप मोठी दुर्घटना दरड कोसळून घडली होती. त्यावेळी अहमदनगर जिल्हा शिक्षक परिषदेच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी ५ लाख रुपयाचा निधी गोळा करून पूरग्रस्तांसाठी शैक्षणिक साहित्य व समाज उपयोगी साहित्य गेले होते त्यावेळी टेम्पो बरोबर स्वतः क्लीनरच्या भूमिकेत दत्तात्रेय गवळी सर हे स्वतः या साहित्याच्या टेम्पो मध्ये बसून महाड या ठिकाणी गेले होते. त्यांच्या कार्याची दखल शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे सर यांनी घेतली होती. त्यांच्या या कार्याबद्दल प्राथमिक शिक्षकांतून जिल्हाभर कौतुक होत आहे.
COMMENTS