अहमदनगर / नगर सह्याद्री लाचलुचपत विभागाने अहमदनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. आरोपी यासिन नासर अरब (विशेष वसुली व विक्री अधिकारी,अहमदनगर ता...
अहमदनगर / नगर सह्याद्री
लाचलुचपत विभागाने अहमदनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. आरोपी यासिन नासर अरब (विशेष वसुली व विक्री अधिकारी,अहमदनगर तालुका पतसंस्था फेडरेशन) हा लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे.
कर्जफेडीसाठी मुदतीत वाढ दिल्याच्या कारणातून तक्रारदारास त्याने लाचेची मागणी केली होती. समजलेली अधिक माहिती अशी की, भोरवाडी येथील तक्रारदार यांनी 2016 मध्ये भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, मर्या.केडगाव येथून 5 लाखांचे कर्ज घेतले होते,
सदर कर्ज घेते वेळी तक्रारदार यांनी त्यांच्या आई व मामाच्या नावे असलेली त्यांची भोरवाडी शिवारातील जमीन तारण म्हणून दिली होती. तक्रारदार मुदतीत कर्ज फेड करू शकले नाही, त्यामुळे सदर वसुली करण्यासाठी सहायक निबंधक सहकारी संस्था, अहमदनगर तालुका पतसंस्था फेडरेशनने दि.25 मे 2023 रोजी सुनावणी ठेवली होती,
तक्रारदाराने वसुली अधिकारी आलोसे अरब यांना कर्ज फेड करण्यासाठी 2 महिन्याची मुदत मागितली.त्यांनी तोंडी दोन महिन्याची मुदत वाढ दिली होती, त्यानंतर तक्रारदाराने 31 ऑगस्ट /2023 रोजी कर्ज फेडले. परंतु त्यानंतर आलोसे अरब यांनी तक्रारदार यांना मी तुला कर्ज फेड करण्यास मुदत दिली, तुझ्या जमिनीवर जप्ती येऊ दिली नाही, लिलाव होऊ दिला नाही.
या मदत केल्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २० हजार रुपये मान्य केले. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार सापळा लावण्यात आला. आरोपीने सदर लाच फोन पे वर पाठवण्यास सांगितली.
आज दि.15 सप्टेबर 2023 रोजी आरोपी हे कार्यालयात हजर असताना सापळा लावून कारवाई करण्यात आली. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
COMMENTS