श्रीरामपूर / नगर सह्याद्री समाजात काय घटना घडतील याचा नेम राहिला नाही. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोणत्याही प्रकारचे खाते बँके...
श्रीरामपूर / नगर सह्याद्री
समाजात काय घटना घडतील याचा नेम राहिला नाही. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोणत्याही प्रकारचे खाते बँकेत नसताना, एका व्यक्तीच्या नावावर सुमारे दहा लाख रुपये कर्ज दुसऱ्याच कुणीतरी घेतल्याचा प्रकार घडला आहे.
हे कर्ज थोडे फार नसून तब्बल १० लाखांचे आहे. त्यामुळे सदर इसमाच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. या इसमाचे नाव राजू चंद्रकांत शिंदे असे असून हा प्रकार श्रीरामपुरातील एका बँकेत घडला.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी राजू शिंदे यांनी महात्मा गांधी पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. शहरातील एका बँकेच्या शाखा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात तालुक्यातील जुने नायगाव येथील राजू चंद्रकांत शिंदे यांनी म्हटले आहे की, माझे कोणत्याही प्रकारचे खाते आपल्या बँकेत नसतानाही माझ्या नावावर सुमारे दहा लाख रुपये कर्ज घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे.
मला शेतीसाठी एका बँकेतून कर्ज घ्यायचे होते. त्यासाठी सदर बँकेने माझे सिबिल तपासले असता, वरील घडलेला प्रकार माझ्या लक्षात आला. आपल्या बँकेकडे माझ्या नावावर कर्ज कोणी काढले, त्या खात्याचा खाते नंबर काय, याबाबत माहिती विचारली असता बँकेतून मला कर्ज खात्याचा उतारा दिला.
त्यानुसार माझ्या नावे कोणी कर्ज काढले, याबाबत उल्लेख आढळून आला नाही, तुमच्या या प्रकारामुळे माझे सिबिल खराब झाले असून मला कोणतीही बँक कर्ज देत नाही.
आपल्या चुकीमुळे माझ्यावर व माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन मला न्याय मिळावा असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
COMMENTS