अहमदनगर / नगर सह्यद्री पूर्ववैमनस्यातून विविध गुन्हे घडताना दिसतात. आता याच कारणातून तरुणावर चाकूने हल्ला करण्याची धक्कादायक घटना सावेडी उ...
अहमदनगर / नगर सह्यद्री
पूर्ववैमनस्यातून विविध गुन्हे घडताना दिसतात. आता याच कारणातून तरुणावर चाकूने हल्ला करण्याची धक्कादायक घटना सावेडी उपनगरात घडली. सचिन अशोक भांड (वय 36 रा. शिमला कॉलनी, पंचवटीनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश बापुराव म्याना (वय 35 रा. श्रमिकनगर), प्रशांत बलराज म्याना (वय 43), राजू उर्फ नितीन प्रल्हाद शिंदे (वय 38 दोघे, रा. शिमला कॉलनी, पंचवटीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच तोफखाना पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी सचिन भांड व महेश म्याना यांच्यात वाद झाले होते. सचिन यांनी महेश याची माफी मागितल्यानंतर सदरचे वाद मिटले होते.
बुधवारी रात्री सचिन व त्यांचे दोन मित्र पंचवटीनगरच्या शिमला कॉलनीत गप्पा मारत असताना महेश, प्रशांत व राजू तेथे आले. ते तिघे येताच सचिनचे दोन्ही मित्र तेथून निघून गेले. काही वेळातच तिघांनी सचिन यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सचिन यांच्या घरातून त्यांचे वडिल व इतर नातेवाईक पळत आल्याने हल्ला करणारे तिघे पसार झाले.
COMMENTS