अहमदनगर / नगर सहयाद्री अहमदनगर जिल्हयातील राजकारण नात्यागोत्याचं राजकारण आहे असे म्हटले जाते. अहमदनगर च्या राजकारणावर वरिष्ठ देखील लक्ष ठे...
अहमदनगर / नगर सहयाद्री
अहमदनगर जिल्हयातील राजकारण नात्यागोत्याचं राजकारण आहे असे म्हटले जाते. अहमदनगर च्या राजकारणावर वरिष्ठ देखील लक्ष ठेऊन असतात. आता नगर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा ढवळण्याची चिन्हे दिसत आहेत.
त्याचे कारण असे की, पक्षाध्यक्ष व ज्येष्ठनेते शरद पवार यांना सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात गेलेल्या जिल्ह्यातील चार आमदारांविरुद्ध आता राष्ट्रवादीचा शरद पवार गट आक्रमक भूमिका घेणार असल्याचं आ. प्राजक्त तनपुरे व शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितलंय.
या दोघांनी आता शरद पवार गटाची जिल्ह्यातील नवी संघटना बांधणीचेही नियोजन केले असल्याचे समजते. त्यामुळे आता जे नेते कधी काळी मिले सूर मेरा तुम्हारा असं म्हणत होते ते आता विरोधात भूमिका घेताना दिसतील असे चित्र निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडून आता जवळपास दोन महिने होत आले आहेत.
या पार्श्वभूमीवर, शरद पवारांच्या गटातून अजित पवारांच्या गटात गेलेल्यांपैकी कोणी परत माघारी फिरते काय, याचा अंदाज घेण्यात आला आहे. त्यासाठी काहींना पुरेशी संधीही दिली गेली आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष फाळके यांनी बैठक घेतली.
यावेळी आ. तनपुरेंसह माजी आमदार दादा कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, महिला जिल्हाध्यक्ष योगीता राजळे आदी उपस्थित होते. आढावा बैठकीस नगर तालुका, जामखेड, नेवासे, शेवगाव, पाथर्डी व राहुरी या सहा तालुक्यांचे तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा कार्यकारिणीच्या 90 पदाधिकार्यांपैकी तब्बल 60 जण उपस्थित होते.
आता जिल्हाध्यक्ष फाळके व आ. तनपुरे हे संयुक्तपणे येत्या 20 ते 30 सप्टेंबरपर्यंत जिल्हा दौरा करणार आहेत. या दौऱ्यातून ते संघटनाबांधणी करणार आहेत. शरद पवारांना दगाफटका करणार्या जिल्ह्यातील चार आमदारांविरुद्ध आक्रमक भूमिका घेणार असल्याचे फाळके यांनी जाहीर केले. मात्र, त्याचे स्वरुप स्पष्ट केले नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या अहमदनगर मध्ये राष्ट्रवादीच्याच दोन गटात विरोध होताना दिसत आहे.
COMMENTS