मुंबई / नगर सह्याद्री महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. दरम्यान राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेते एकम...
मुंबई / नगर सह्याद्री
महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. दरम्यान राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.
आता आ.अमोल मिटकरींनी आ.रोहित पवार यांच्याबाबत जे वक्तव्य केले आहे त्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी भरतीसाठीचा शासन आदेश काढला असून ९ कंपन्यांना त्याचे कंत्राट दिले आहे. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शासन निर्णयाचे समर्थन करताना, एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील, असे विधान केल होते.
त्यावरुन, आ.रोहित पवार यांनी नाव न घेता अजित पवारांवर टीका केली होती. एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील, अशा शब्दात आ. रोहित पवार यांनी अजित पवारांवर नाव न घेता पटलवार केला.
त्यावरुन, आता राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटातील नेते रोहित पवारांना प्रत्युत्तर देत आहेत. अजित पवारांचे खंदे समर्थक आ. अमोल मिटकरी यांनीही ट्विट करुन रोहित पवारांवर पलटवार केला आहे. त्यात, रोहित पवार हेही सत्तेत सहभागी होण्यासाठी समर्थनीय होते, असा गौप्यस्फोटच त्यांनी केला आहे.
दादा, आपण लहान आणि नवखे आहोत अजुन राजकारणात! ज्यांच्याविरुद्ध आपण बोलत आहात त्यांनी आपल्यापेक्षा अनेक उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेले आहेत. सत्तेत सहभागी होताना सर्वप्रथम समर्थन आपलेच होते याचा मी स्वतः साक्षीदार आहे. आता, सरकारला सरकारचे काम करू द्या आणि स्वतःला सावरा, असे म्हणत रोहित पवारांवर बोचरा पलटवार केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
COMMENTS