पारनेर | नगर सह्याद्री श्रावणी सोमवार निमित्त सोमवारी हंगा येथील श्री क्षेत्र हंगेश्वराचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दर्शन घेतले. हंगा...
पारनेर | नगर सह्याद्री
श्रावणी सोमवार निमित्त सोमवारी हंगा येथील श्री क्षेत्र हंगेश्वराचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दर्शन घेतले. हंगा गावात त्यांची मिरवणूक काढत खांद्यावर उचलून घेत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यातून खासदार विखे यांनी आमदार नीलेश लंके यांना डिवचल्याची चर्चा झडू लागली.
गेल्या अनेक महिन्यापासून गप्प असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आमदार लंके पुन्हा जोमाने विखे पाटील पिता पुत्रावर राजकीय हल्लाबोल करण्याची शयता आहे. हंगा येथील हा कार्यक्रम सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खासदार विखे पाटील व आमदार लंके समर्थकांमध्ये यातून कमेंट वॉर पाहायला मिळाले.
राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार सहभागी होऊन ते उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आमदार लंके यानी विखे पाटील पिता-पुत्रावर टीका करण्याचे अनेक सार्वजनिक व राजकीय कार्यक्रमात टाळले. सरकारमध्ये काम करत असल्याने वरिष्ठ पातळीवर तशा सूचना पण असल्याची माहिती समजली होती.
परंतु सोमवारी हंगे गावात येऊन भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रम घेऊन व विकास कामांसाठी निधी देण्याचे जाहीर करून आमदार लंके यांना डिवचले असल्याची चर्चा आहे. यावेळी हंगा येथील ग्रामस्थांनी खासदार विखे पाटील यांच्याकडे हंगा ते दळवी वस्ती ३.५ किलोमीटर रस्त्यासाठी निधी देण्याची मागणी केली.
आजी माजी आमदार समर्थक विखे गोटात?भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पारनेर तालुयात विशेष लक्ष घातले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नीलेश लंके यांचे समर्थक व पारनेर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्याशी संपर्क वाढवला आहे. दोन दिवसांपूर्वी खासदार विखे पाटील भाजपच्या जनसंपर्क कार्यालय उद्घाटनास आले असता शिवसेनेचे (उबाठा) माजी आमदार विजय औटी यांचे कट्टर समर्थक व शहर प्रमुख नीलेश खोडदे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेत चर्चा केली. खासदार सुजय विखे पाटील यांच्या गोटात आजी-माजी आमदार समर्थक दाखल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सुपा औद्योगिक वसाहतीत हंगा येथील शेतकर्यांच्या जमीनी गेल्या आहेत. त्यामुळे सुपा-हंगा असे नामकरण करावे. हंगा गावात राजकारण करण्यापेक्षा विकासासाठी आपले प्राधान्य असल्याचे सांगून मुंबईला उद्योगमंत्री समवेत मंगळवारी बैठक होणार असून सुपा-हंगा औद्योगिक वसाहत असे नामकरणाबाबत चर्चा करण्याचे आश्वासन खासदार विखे पाटील यांनी दिले.
हंगामधील युवक मित्रांनी भर पावसात खासदार डॉ. विखे पाटील यांचे जंगी स्वागत केले. तसेच हंग्यातील आसामी मळा येथील बुवासाहेब मित्र मंडळ आणि वस्तीवरील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत उपस्थितांशी खा. विखे यानी संवाद साधला. यावेळी माजी सभापती काशिनाथ दाते, विश्वनाथ कोरडे, राहुल शिंदे, सचिन वराळ पाटील, माजी नगराध्यक्ष विजय औटी, सुभाष दुधाडे, तालुकाध्यक्ष सुनील थोरात, सुपे येथील युवा नेते योगेश रोकडे, उपसरपंच दत्ता नाना पवार, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, वडनेरीचे सरपंच लहू भालेकर, डॉ. भाऊसाहेब खिलारी, भाजपा शहराध्यक्ष किरण कोकाटे आदी यावेळी उपस्थित होते.
COMMENTS