अहमदनगर / नगर सह्याद्री - अबालवृद्धांचे लाडके दैवत असणारा विघ्नहर्ता ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पाचा जयघोष करीत नगर श...
अहमदनगर / नगर सह्याद्री -
अबालवृद्धांचे लाडके दैवत असणारा विघ्नहर्ता ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पाचा जयघोष करीत नगर शहरासह जिल्ह्यात घरोघरी थाटात विराजमान झाले. नगर शहर व उपनगरात प्रथमच श्री गणेशाच्या आगमनासाठी ५२ गणेश मंडळांनी मिरवणुका काढल्या.
नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते विधीवत पूजा करुन श्रीें ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी सौ. श्रेया ओला, मान्या ओला, वेदांश ओला, विशाल गणपती देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर, आमदार संग्राम जगताप, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, पुजारी संगमनाथ महाराज आदींसह विश्वस्त, गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह दिसून येत आहे. लाडया बाप्पाच्या आगमनासाठी घरोघरी जय्यत तयारी करण्यात आली होती.
शहरातील काही छोट्या मोठ्या मंडळांनी त्यांच्या भव्य गणेश मूर्तींना सोमवारी ढोल ताशांच्या गजरात मंडपात आणले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लेझीम, नृत्याचा फेर धरत गणरायाचे स्वागत केले. यंदा मागील वर्षी पेक्षा शाडू मातीच्या गणेश मूर्तींना मागणी असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात यंदा ३२५ गावांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला.
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने जिल्हाभरात सुमारे साडे तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्हा बाहेरून अतिरिक्त कुमक मागवली आहे.
पुढील १० दिवस भक्तीमय वातावरणात साजरा केल्या जाणार्या गणेशोत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात आहे.
अधीक्षक ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक २, पोलीस उपअधीक्षक ७, पोलीस निरीक्षक २८, सहायक पोलीस निरीक्षक ३३, पोलीस उपनिरीक्षक ५२, पोलीस अंमलदार १७२५, युआरटीचे २ पथके, आरसीपीचे ३ पथके व १० ट्रॅकिंग फोर्स याशिवाय १६५० होमगार्ड असा जिल्ह्यातील बंदोबस्त असणार आहे. जिल्ह्याबाहेरून आलेल्या बंदोबस्तामध्ये पोलीस उपअधीक्षक एक, पोलीस निरीक्षक ७, पोलीस उपनिरीक्षक ८, परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक १५०, महिला पोलीस अंमलदार १००, एसआरपीची १ कंपनी, रॅपिड ऍशन फोर्स दाखल झाले आहे. पुढील १० दिवस हा बंदोबस्त राहणार आहे. पोलीस ठाणे हद्दीत गस्त वाढविली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व प्रभारी अधिकार्यांना पोलीस अधीक्षक ओला यांनी सूचना दिल्या आहेत. नागरिकांनीही कायद्याचे पालन करून उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन अधीक्षक ओला यांनी केले आहे.
COMMENTS