कसारे येथे नागरिकांशी साधला संवाद संगमनेर | नगर सह्याद्री- दुष्काळी परीस्थीती ओढवलेल्या गावांत तातडीने पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याच्या...
कसारे येथे नागरिकांशी साधला संवाद
संगमनेर | नगर सह्याद्री-
दुष्काळी परीस्थीती ओढवलेल्या गावांत तातडीने पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पिण्यासाठी पाणी आणि जनवारांसाठी चारा हाच सरकारचा प्राधान्यक्रम आहे. पाणी उपलब्ध असलेल्या भागात चारा उत्पादनासाठी शेतकर्यांना बियाणे देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहीती महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
तालुयातील कसारे येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास भेट देवून भाविकांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या समस्यावर मंत्री विखे पाटील यांनी कसारे गावात मागणी प्रमाणे ताताडीने टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. निळवंडे कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन झाले आहे. अकोले तालुयातील काही भागात कालव्यांच्या कामातील त्रुटी तातडीने दुरूस्त करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या आहेत. याचे कामही वेगाने सुरू असून पहिल्या चाचणीवेळी पाणी गळतीमुळे शेतकर्यांचा संघर्ष निर्माण होवू नये, हा प्रयत्न आहे. लाभक्षेत्रात सर्वाना पाणी देण्याची भूमिका सरकारची असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावर्षी पावसाने दडी मारल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप पावसाची प्रतिक्षा आहे; परंतू सरकार या सर्व परिस्थीतीबाबत गंभीर असून धरणात उपलब्ध पाणीसाठा पिण्यास राखून ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पशुधन वाचविण्याचे मोठे आव्हान आहे. यासाठी ज्या भागात पाणी आहे तेथे चारा उत्पादनासाठी शेतकर्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मूर घासही कमी दराने देण्याचा निर्णय शासन स्तरावर करण्याचे सुतोवाच त्यांनी केले. दूध उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने चांगले निर्णय घेतले असून, आघाडी सरकारच्या काळात खाली आलेले दर लक्षात घेवून आता किमान ३४ रूपये दर देण्याबाबत कार्यवाही सुरू झाल्याचे स्पष्ट केले. लम्पी साथ रोगाच्या संकटात सरकारने सर्व पशुधनाचे लसीकरण मोफत करून दिले आहे. दुसर्या लाटेत वासरांना या साथीचा झालेला त्रास लक्षात घेत पुन्हा मोफत लसीकरण करण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. ग्रामस्थांनी सभागृहाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे मंत्री विखे पाटील यांनी आश्वासन दिले.
तुम्हालाही देवदर्शनाला घेऊन जावू
शिर्डी मतदार संघातील महिलांना पंढरपूर आणि तुळजापूर येथे दर्शनासाठी आयोजित केलेल्या सहलीचा मुद्दा महिलांनी उपस्थित केला. काळजी करू नका आम्ही तुम्हालाही दर्शनाला घेऊन जावू, असे आश्वासन महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
COMMENTS