साजन पाचपुते शिवबंधनात अहमदनगर / नगर सह्याद्री - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते हे शिवसेना ठाकरे गट...
साजन पाचपुते शिवबंधनात
अहमदनगर / नगर सह्याद्री -
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते हे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेऊन पक्षात प्रवेश केला. त्यामुळे भविष्यात राज्यात आणखी एका काका विरुद्ध पुतण्याची राजकीय लढत पाहायला मिळू शकते, कारण साजन पाचपुते यांना ठाकरे गटात मोठी जबाबदारी दिली असून प्रवेशासोबतच शिवसेना उपनेते पद दिले असल्याचे समजते.
बबनराव पाचपुते यांचे भाऊ सदाअण्णा पाचपुते यांच्या निधनानंतर पाचपुते कुटुंबात फूट पडलेली पाहायला मिळत होती. त्याचा फटका आमदार पाचपुते यांना सरपंच पदाच्या निवडणुकीत बसला. साजन पाचपुते हे भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या काष्टी गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत साजन पाचपुते विरुध्द प्रतापसिंह बबनराव पाचपुते अशी लढत झाली आणि साजन यांनी बहुमताने विजय मिळवला आणि त्यावेळी पाचपुते कुटुंबात वादाची ठिणगी पडली. साजन पाचपुते यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकही आमदार पाचपुते यांच्या गटाविरुध्द लढवली आणि जिंकली सुध्दा.
साजन पाचपुते यांच्याकडे काष्टी गावचे सरपंच आणि बाजार समितीचे संचालक ही पदं असतानाही राजकीयदृष्ट्या साजन पाचपुते कुठल्याही पक्षात नव्हते. मात्र, साजन पाचपुते आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मागील महिन्यात मुंबईत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची साजन पाचपुते यांनी भेट घेतली, त्यावेळी साजन हे ठाकरे गटाच्या पक्षात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झाला होता.यामुळे श्रीगोदा मतदार संघात शिवसेना बळकट होणार आहे. श्रीगोदा मतदार संघातील नगर तालुक्यातील गावांमध्ये शिवसेना मजबूत होती पण श्रीगोदा भागात खूपच कमकुवत होती.साजन पाचपुते यांच्या रूपाने नवे नेतृत्व शिवसेनेला मिळाल्याने या मतदार संघात शिवसेनेची ताकत मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आता श्रीगोदा मतदार संघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना अशी चौरंगी ताकद दिसून येणार आहे.
COMMENTS