जास्त भाडे आकारणाऱ्या १६ खाजगी वाहन चालकांवर कोतवाली पोलिसांची कारवाई अहमदनगर / नगर सह्याद्री जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूम...
जास्त भाडे आकारणाऱ्या १६ खाजगी वाहन चालकांवर कोतवाली पोलिसांची कारवाई
अहमदनगर / नगर सह्याद्री
जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. एसटी महामंडळ प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने रविवारी (दि.३) काही बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १० एसटी बसेस पोलीस संरक्षणात पुण्याकडे रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि डेपो मॅनेजर विठ्ठल खेंगारकर यांनी दिली.
अहमदनगर शहरातून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन कोतवाली पोलिसांनी पुढाकार घेत डेपो मॅनेजर विठ्ठल खेंगारकर यांच्याशी चर्चा करून दहा बसेस पुण्याकडे पोलीस संरक्षण देऊन सोडल्या आहेत. माळीवाडा व पुणे बसस्थानक येथे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दोन दिवसांपासून पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमले आहेत. एस टी महामंडळाच्या बसेस बंद असल्याने काही प्रवाशांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. खाजगी वाहन चालकांकडून जास्तीचे भाडे आकारणाऱ्या खाजगी वाहन चालकांवर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारी दोन दिवसांपासून कारवाई करीत आहेत. दोन दिवसात जास्तीचे भाडे आकारणाऱ्या १६ खाजगी वाहन चालकांवर कारवाई करून ३९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम शेख, दीपक बोरुडे, राजेंद्र चव्हाण, प्रशांत बोरुडे, सतीश धिवर, सोमनाथ मुरकुटे, ज्ञानेश्वर मोरे, संतोष जरे, रामदास थोरात, गुलाब शेख, श्रीकांत खताडे यांनी ही कारवाई केली.
जास्तीचे भाडे कोणी आकारत असल्यास तक्रार करा..
सध्या वाहनांची कमतरता असल्याने काही वाहन चालक प्रमाणापेक्षा जास्त भाडे आकारणी करत आहेत. कोणी अशाप्रकारे जास्तीचे भाडे घेत असल्यास 77 77 92 46 03 या क्रमांकावर संपर्क करून तक्रार करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केले आहे.
COMMENTS