जालना | नगर सह्याद्री राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांचे उ...
जालना | नगर सह्याद्री
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज १४ वा दिवस आहे. रविवार सकाळपासून त्यांनी पाणी आणि औषध उपचार घेण्यास ही नकार दिला होता. सोमवारी त्यांनी उपचारासही विरोध केल्याने चिंता वाढली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या १४ दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. सरकारकडून मराठा समाजाला कुणबी प्रमाण पत्र मिळावे म्हणून वंशावळीच्या आधारे आधादेश ही काढण्यात आला. मात्र यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारला चार दिवसाचा अल्टीमेटम दिला होता.
हा चार दिवसाचा अल्टीमेटम संपल्यानंतर जरागे यांनी काल सकाळपासून पाणी आणि औषध उपचार घेण्यासही नकार दिला आहे. आज जिल्हाआरोग्य अधिकार्यांच्या पथकाने सकाळी त्यांची तपासणी करण्यासाठी आंदोलन स्थळ गाठून त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यास जरांगे पाटील यांनी नकार दिला असून सुधारित अध्यादेश आणल्यास मी उपचार घेतो असे डॉटरांना सांगितले आहे.
मराठा आरक्षणाबाबत चांगला निर्णय घेऊ ः मुख्यमंत्री
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार कोणताही निर्णय घाईगडबडीत घेणार नाही. हा निर्णय घाईगडबडीत घेतला आणि न्यायालयाने त्याला स्थगिती दिली तर ती फसवणूक ठरेल. राज्य सरकार कोणालाही फसवू इच्छित नाही. सरकारला मराठा समाजासाठी थातुरमातूर किंवा तात्पुरतं काम करायचे नाही. मराठा समाजाला त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे आम्ही जे करु ते कायदेशीर, चांगली फळं देणारं आणि समाजाला फायदा देणारं असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते सोमवारी भीमाशंकर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
तुमच्यासमोर नाक घासायला मागे पुढे पाहणार नाही
मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावूक आवाहन केल आहे. जे सत्तेत आहेत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरावा हा त्यांना आमचा संदेश आहे. आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. अजित पवार कमी पडलो असं म्हणाले होते. आता आम्ही त्यांना विनंती करतो, त्यांनी चार-पाच पक्षांना एकत्र घेऊन आरक्षणाचा विषय लावून धरावा. मराठा समाजाला आरक्षण मिळाले, तर त्यांच्यासमोर नतमस्तक होईन. अगदी नाक घासायला मागे पुढे पाहणार नाही. आम्हा गोरगरिबांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवावा. मराठा समाजाला आरक्षण देऊन त्यांनी गोरगरिब मराठ्यांचं कल्याण करावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी अजित पवार यांना केलं.
काय म्हणाले डॉटर?
उपचारासही नकार दिल्याने जरांगे पाटील यांची प्रकृती आता गंभीर होत चालली असल्याने चिंता वाढली आहे. कालपासून पाणी न पिल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, ब्लड शुगरची पातळी कमी होण्याचे धोके आहेत, मात्र तपासणी केल्याशिवाय माहिती देता येणार नाही, असे डॉटरांनी सांगितले आहे.
मराठा आंदोलनात छावा संघटनेची उडी...
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छावा संघटनाही आक्रमक झाली आहे. मराठा आरक्षणाची लढाई आरपारची आणि शेवटची आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना वेळ पडली तर हातात दंडुके घेऊन रस्त्यावर उतरेल अशी भूमिका संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी मांडली आहे.
COMMENTS