मनपा अधिकार्यांचे दुर्लक्ष | आयुक्तांनाही पडला स्वतःच्याच आदेशाचा विसर अहमदनगर | नगर सह्याद्री रस्त्याच्या कडेला असलेल्या खासगी जागेत पक्क...
मनपा अधिकार्यांचे दुर्लक्ष | आयुक्तांनाही पडला स्वतःच्याच आदेशाचा विसर
अहमदनगर | नगर सह्याद्री
रस्त्याच्या कडेला असलेल्या खासगी जागेत पक्के बांधकाम न करता केवळ लोखंडी अँगलला रंगीबेरंगी लोखंडी पत्रे ठोकून दुकाने थाटण्यात येत आहेत. उपनगरासह शहरात वाढत्या पत्र्यांच्या गाळ्यांना आळा बसविण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. मध्यतंरी सावेडी उपनगरात पत्र्यांच्या गाळ्यांना आग लागल्यानंतर पत्रा मार्केटचा विषय ऐरणीवर आला होता. त्यावेळी आयुत डॉ. पंकज जावळे यांनी गाळ्यांवर कारवाई करावी अन्यथा त्यांना कर आकारणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता पुन्हा पत्र्यांच्या गाळ्याचे पेव वाढत चालले आहे.
पत्र्यांच्या गाळ्यात उपनगरासह संपूर्ण शहरात झपाट्याने वाढ होत आहे. खासगी जागेसह महापालिका व शासकीय जागेत हे गाळे उभारले जात आहे. यासाठी परवानगी न घेता सरळ टोलेजंग दुकान थाटले जात आहे. त्यामुळे महापालिकेला कोट्यवधी उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. याबाबत आयुत खमकी भूमिका घेत नसल्याने काही महापालिका अधिकारी व कर्मचार्यांचे फावत आहे. गेल्या चार-पाच वर्षात नगर शहरात असे सुमारे तीन ते साडेतीन हजार गाळे झाले आहेत. सावेडी, केडगाव, बोल्हेगाव भागात कोणतीही नोंद न करता पत्र्यांचे गाळे उभारले जात आहेत. बांधकामासाठी महापालिकेची परवानगी लागते. मात्र अशा पत्र्यांच्या गाळ्यांना ना परवानगी ना नोंद, अर्ध्या रात्रीत गाळा तयार करण्यात येत आहे.
तीन वर्षापूर्वी महापालिकेने सर्व्हेक्षण केले असता सुमारे १५०० हजारांच्या वर पत्र्यांचे गाळे होते. त्यानंतर कोरोना काळात या पत्रा गाळ्यांचे पेवच फुटले. सर्वाधिक खासगी जागेत अशा प्रकारचे गाळे उभारले आहेत. आता गाळ्याचा आकडा वाढला आहे. मध्यतंरी गुलमोहर रस्त्यावरील पारिजात चौकात पत्र्यांच्या गाळ्यांना आग लागली होती. जीवित हानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठे झाले होते. त्यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी आयुतांना लक्ष्य करून त्यांनाच दोषी ठरविले होते. आयुतांनी वेळीच आळा घालावा, नाहीतर या गाळ्यांना कर आकारून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचा पर्याय आ. जगताप यांनी सुचविला होता. त्यानंतर आयुतांनी प्रभाग अधिकार्यांना पत्र्यांच्या गाळ्यांची माहिती संकलित करून त्यांना कर आकारण्याचे तसेच कर न भरणार्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र दोन महिन्यानंतरही कोणतीच कारवाई नाही. आयुतांनाही स्वतः दिलेल्या आदेशाचा आता विसर पडला आहे.
COMMENTS