कोतवाली पोलिसांची कारवाई; ३ दिवसांची पोलीस कोठडी अहमदनगर / नगर सह्याद्री कोयत्याचा धाक दाखवून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मंडप व्यापाऱ्याल...
कोतवाली पोलिसांची कारवाई; ३ दिवसांची पोलीस कोठडी
अहमदनगर / नगर सह्याद्री
कोयत्याचा धाक दाखवून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मंडप व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील दोन आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. संकेत बाळासाहेब तारडे (वय २३ वर्षे, रा. बुरुडगांव, अहमदनगर), विजय बबन नवथरे (वय २० वर्षे, रा. मुरुडगाव, अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी अभिषेक विजय मोढवे (रा. अंबिका चौक, वाकोडी फाटा, सोलापुर रोड, अहमदनगर) याला यापूर्वीच कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.
बुरुडगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉन येथे दि. १९ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री मालवाहू टेम्पो (एम.एच.16.ए.वाय.937) घेऊन जाणाऱ्या दोघांना मारहाण करत लुटल्याची घटना घडली होती. चार जणांच्या टोळीने कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी यांच्याकडील ११ हजारांची रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा घडल्यानंतर तात्काळ एका आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली होती. तसेच इतर दोन आरोपी वाडिया पार्क परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी या दोघांना सापळा लावून अटक केली. आरोपींना मा न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अश्विनी मोरे पुढील तपास करीत आहेत.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक अश्विनी मोरे, पो.हे.कॉ. तनवीर शेख, पोहेकॉ गणेश धोत्रे, पो.ना. योगेश भिंगारदिवे, पो.ना. संदिप पितळे, पो.कॉ. संदिप थोरात, अमोल गाडे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे यांनी ही कारवाई केली.
COMMENTS