अहमदनगर | नगर सह्याद्री नगर शहरासह संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नाशिक व नवी मुंबई परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणार्या नाशि...
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर शहरासह संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नाशिक व नवी मुंबई परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणार्या नाशिकच्या दोघांना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. लहु बबन ऊर्फ बबलु काळे (रा. पळसे, जि. नाशिक) व विनोद गोविंद पिंपळे (रा. गोसावीवाडी, नाशिक रस्ता) अशी त्यांची नावे आहेत.
अटक केलेल्या दोघांनी सात ठिकाणी चैन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चार लाख ७५ हजार रूपये किंमतीचे ९५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एक लाख रूपये किमतीची दुचाकी असा पाच लाख ७५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
प्रिया मुकुंद झंवर (वय ३५ रा. छायानगर, रेल्वे स्टेशन, नगर) या त्यांच्या मुलासोबत दुचाकीवरून जात असताना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चोरून नेले होते. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपासासह जिल्ह्यात घडलेल्या चैन स्नॅचिंग गुन्ह्याचा तपास करण्याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आदेश दिले होते.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार विजय वेठेकर, दत्तात्रय हिंगडे, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, भीमराज खर्से, सागर ससाणे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, भाग्यश्री भिटे व संभाजी कोतकर यांचे पथक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करत होते. पोलीस निरीक्षक आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार चैन स्नॅचिंग चोरी करणारे लहु काळे व विनोद पिंपळे नगर- मनमाड रस्त्याने नगरच्या दिशेने दुचाकीवर चोरीचे सोने विक्रीसाठी येणार असल्याचे समजले. निरीक्षक आहेर यांनी पथकाला माहिती देत कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने मनमाड रस्त्यावर कॉटेज कॉर्नर जवळील सीना नदीवरील पुलाच्या जवळ सापळा लावून दोघांना पकडले.
COMMENTS