अहमदनगर येथे विकासवर्धिनी मार्फत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक श्री विनायक देशमुख यांनी दिली.
अहमदनगर | नगर सह्याद्री
केंद्र सरकारच्या सी.एस.आर. (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलीटी) कायद्यामुळे स्वयंसेवी संस्थांसाठी त्यांच्या विकास कामांना मोठा निधी उपलब्ध झाला असून या संदर्भातील तिसरी कार्यशाळा रविवार दि. ३ सप्टेंबर २०२३ रोजी अहमदनगर येथे विकासवर्धिनी मार्फत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक श्री विनायक देशमुख यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना देशमुख म्हणाले, सी.एस.आर. कायद्या अंतर्गत आज देशातील वीस हजार पेक्षा जास्त कंपन्या पात्र असून त्यांच्यामार्फत स्वयंसेवी संस्थांसाठी दरवर्षी २५ हजार कोटींचा निधी उपलब्ध आहे. मात्र ग्रामीण व शहरी भागातील संस्था देखील यासंदर्भातील आवश्यक ती योग्य माहिती नसल्यामुळे सी.एस.आर. चा निधी मिळवु शकल्या नाहीत. स्वयंसेवी संस्थांची सी.एस.आर.भागीदारी वाढावी, या उद्देशाने विकासवर्धिनीने विशेष पुढाकार घेतला असुन अहमदनगर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सी. एस. आर. अंतर्गत प्रामुख्याने दारिद्र्य व कुपोषण निर्मूलन, आरोग्य सुविधा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, ग्रामीण स्वच्छता प्रकल्प , शैक्षणिक प्रकल्प, कौशल्य विकास कार्यक्रम, महिलांचे सक्षमीकरण, महिला आणि मुलींसाठी वसतिगृह, वृद्धाश्रम, पर्यावरण संरक्षण प्रकल्प पशुसंवर्धन व पशु कल्याण, वनशेती, नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण, मृद व जल संधारण प्रकल्प , कला, संस्कृती व परंपरांचे संगोपन, सार्वजनिक ग्रंथालये, पारंपारिक कला आणि हस्तकलांचा विकास, माजी सैनिक तसेच सैनिक विधवांच्या कल्याणाचे प्रकल्प, ग्रामीण भागातील विविध क्रीडा प्रकारांना चालना देणारे प्रकल्प, अनुसूचित जाती- जमाती, इतर मागासवर्गीय , अल्पसंख्यांक, महिला यांच्या कल्याणाचे प्रकल्प, ग्रामविकास व झोपडपट्टी निर्मूलन प्रकल्प, अशा तसेच नाविन्यपूर्ण प्रकल्पांना अर्थसहाय्य मिळू शकते.
या कार्यशाळेमध्ये निधी मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, प्रकल्प कसा तयार करावा, याबाबतचे मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय पात्र कंपन्यांची माहिती, यासंदर्भातील सरकारचे नियम व कायदे, सी.एस.आर. अंतर्गत पात्र असलेल्या प्रकल्पांची माहिती, प्रकल्पाचे नियोजन, प्रस्ताव बनविणे त्याची अंमलबजावणी, अर्थसहाय्य करणार्या कंपन्यांचे प्रकार, सी.एस.आर. बद्दलच्या मर्यादा व गैरसमज, सी.एस.आर. संदर्भातील माहिती मिळवण्याच्या पद्धती, सी.एस.आर. साठी आपला भागीदार निवडण्याबाबत व प्राधान्याने निधी मिळवण्यासाठी कोणते प्रस्ताव तयार करावेत, याबाबतचे मार्गदर्शन कार्यशाळेत करण्यात येणार आहे.
विकासवर्धिनी संस्थेने अशा प्रकारच्या कार्यशाळा मराठी भाषेमध्ये आयोजित करण्याबाबत पुढाकार घेतला असुन या तिसरया कार्यशाळेत पुणे, नांदेड, ठाणे, नासिक, पालघर, जळगाव, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, अमरावती, यवतमाळ व अहमदनगर जिल्ह्यातील ५० संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
प्रामुख्याने ग्रामीण भागातील संस्थांना सी.एस.आर. निधीच्या जास्तीत जास्त लाभ व्हावा, या उद्देशाने विकासवर्धिनीने हा पुढाकार घेतला आहे.
COMMENTS