चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंगसह, अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे करणारा भारत हा जगातील चौथा देश बनेल.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची म्हणजेच इस्रोची चांद्रयान-3 मोहीम अंतिम टप्प्यात आहे. चांद्रयान ३आज, २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करणार आहे. या मोहिमेच्या यशामुळे, भारत आकाशात मोठी झेप घेण्यास सज्ज झाला आहे. चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंगसह, अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे करणारा भारत हा जगातील चौथा देश बनेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश असेल.
चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगसाठी देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. इस्रोच्या शास्त्रज्ञांचेही लक्ष विक्रम लँडरकडे लागले आहे. लँडर आज संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्रावर उतरणार आहे. मात्र काही अडचण आल्यास इस्रोने प्लान बी देखील तयार ठेवला आहे.
अहमदाबादमधील इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश एम. देसाई म्हणाले की, चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्याच्या २ तास आधी, आम्ही लँडर आणि चंद्राच्या स्थितीचा आढावा घेऊ. यानंतर आम्ही लँडर चंद्रावर उतरवण्याचा निर्णय घेऊ. लँडर किंवा चंद्राची स्थिती लँडिंगसाठी योग्य नाही असे आम्हाला वाटत असल्यास, आम्ही लँडिंगची तारीख २७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलू. परंतु आमचा पहिला प्रयत्न २३ ऑगस्टला लँडर चंद्रावर उतरवण्याचा असेल.
नीलेश देसाई यांनी सांगितले की, लँडर २३ ऑगस्टला चंद्रापासून ३० किमी अंतरावरुन चंद्रावर लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल. त्यावेळी लँडरचा स्पीड १.६८ किमी प्रति सेकंद असेल. हा वेग खूप जास्त आहे. त्याआधी २ तास आम्ही सर्व कमांड लँडर मॉड्युलला दिल्या जातील. सर्व काही तांत्रिक गोष्टी तपासू दोन तास आधीच आम्ही निर्णय घेऊ.
COMMENTS