स्वातंत्र्यदिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने इन्कलाब जिंदाबाद! चा नारा देत शहरातून मोटारसायकलवर तिरंगा यात्रा काढण्यात आली.
अहमदनगर | नगर सह्याद्री
स्वातंत्र्यदिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने इन्कलाब जिंदाबाद! चा नारा देत शहरातून मोटारसायकलवर तिरंगा यात्रा काढण्यात आली. भारत मातेचा जयघोष करुन निघालेल्या या तिरंगा यात्रेतून सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेचा संदेश देण्यात आला. तर लोकशाही विरोधी, हुकूमशाही व जातीयवादी प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी भारतीयांना एकवटण्याचे आवाहन करण्यात आले.
जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास आपचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन या तिरंगा यात्रेचे प्रारंभ करण्यात आले. यामध्ये शहर जिल्हा संघटक प्रा. अशोक डोंगरे, प्रकाश फराटे, शहराध्यक्ष भरत खाकाळ, संपत मोरे, राजेंद्र कर्डिले, बाळासाहेब खेसे, अॅड. शिलेदार, संतोष नवलखा, राजेंद्र नागवडे, विद्या शिंदे, गौतम कुलकर्णी, महेश घावटे, दिलीप घुले, रवी सातपुते, गणेश मारवाडे, सिताराम खाकाळ आदींसह आपचे कार्यकर्ते व रिक्षा युनियनचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रारंभी सिव्हिल हडको, गणेश चौक येथे माजी ज्येष्ठ नगरसेविका घुले आजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर तिरंगा यात्रा काढण्यात आली. आपच्या तिरंगा यात्रेचे माळीवाडा, आशा टॉकीज चौक, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोड, दिल्ली गेट, अप्पूहत्ती चौकातून मार्गक्रमण होवून पत्रकार चौक येथील शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी समारोप झाला. या यात्रेचे सभेत रूपांतर झाले.
जिल्हाध्यक्ष राजू आघाव म्हणाले की, लोकशाहीचे मूल्य वाचविण्याचे व स्वातंत्र्याचे फळ सर्वसामान्यांना मिळवून देण्याचे कार्य आम आदमी पार्टीच्या माध्यमातून सुरु आहे. आपचा प्रत्येक पदाधिकारी राजकारण हे देशसेवेप्रमाणे करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. मात्र आज देश पुन्हा गुलामगिरीकडे वाटचाल करत असून, लोकशाही धोयात येत आहे. अशा हुकूमशाही विरोधात आपने इन्कलाबचा नारा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. तिरंगा यात्रेत मोटरसायकल, रिक्षा, कार आदींचा समावेश होता.
COMMENTS