छेडछाडीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कोतवाली पोलिसांनी हद्दीतील शाळा कॉलेजच्या परिसरात गस्त वाढवली आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा इशारा | २००० विद्यार्थ्यांचीं कार्यक्रमास उपस्थिती
अहमदनगर | नगर सह्याद्री
छेडछाडीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कोतवाली पोलिसांनी हद्दीतील शाळा कॉलेजच्या परिसरात गस्त वाढवली आहे. तरीसुद्धा विद्यार्थिनींची कोणी छेड काढत असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे. अहमदनगर महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना विनाकारण त्रास देणार्या टवाळखोरांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक यादव यांनी केले.
मुलींसोबत होणार्या छेडछाडीच्या घटनांना आळा बसावा तसेच मुलींमध्ये कायद्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने नगर कॉलेज येथे कोतवाली पोलीस स्टेशन आणि नगर कॉलेज यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी २००० विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. महाविद्यालयीन जीवनात असताना रॅगींग म्हणजे काय?, विनयभंग म्हणजे काय?, कोणी त्रास दिल्यास काय केले पाहिजे? या प्रश्नांवर पोलीस निरीक्षक यादव यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच लैंगिक प्रतिबंधक कायदा, त्यातील मुलींच्या संरक्षणासाठीच्या तरतुदी, महाविद्यालय प्रशासनाने काय खबरदारी घ्यावी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. शाळा-कॉलेजमध्ये असताना कोणी त्रास दिल्यास त्या विद्यार्थिनीने तात्काळ पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे.
कारण जोपर्यंत तक्रार येत नाही तोपर्यंत पोलीस काही करू शकत नाहीत,असेही ते म्हणाले. पोलीस निरीक्षक यादव यांनी कामकाजाच्या दरम्यान आलेले मुलींच्या छेडछाडीचे तसेच कोणत्या प्रलोभनाला बळी पडल्यानंतर मुलींच्या आलेल्या तक्रारी याबाबत अनुभव विद्यार्थ्यांसमोर ठेवले आणि विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण केले. प्राचार्य डॉ आर. जे. बार्नबस, प्रा. डॉ.सय्यद रज्जाक, उपप्रचार्य प्रा. दिलीपकुमार भालसिंग, प्रा. विनीत गायकवाड, प्रा.कुटीनो फ्रॅक्लींन, प्रा. डॉ. नोयल पारगे, दिपक अल्हाट पोलीस जवान योगेश खामकर, देवेंद्र पंधरकर आदींसह विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचार्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. भागवत परकाळ यांनी केले. आभार प्रा. डॉ विलास नाबदे यांनी मानले.
COMMENTS