मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
टोलनाक्याच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरणाऱ्या आणि आमचे सरकार आल्यावर टोलनाके बंद करण्याचे आश्वासन देणाऱ्या ठाकरे गटनेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर मनसेने टीका केली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "बोलण्याऐवजी आमच्यासारखे वागण्याची हिंमत बाळगा," असे त्यांनी म्हटले आहे.
अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आंदोलन झाल्यानंतर ६५ टोलनाके बंद झाले. आम्ही बोलत नाही करुन दाखवतो. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना टोलनाके बंद करायचं का नाही सुचलं? धमक नाही तर फुकटची आश्वासनं द्यायची कशाला? असल्या टोलवाटोलवीला लोकं कंटाळली आता, तेव्हा नुसतं बोलू नका, आमच्यासारखी करुन दाखवायची हिंमत ठेवा' अमेय खोपकर यांनी या ट्विटमध्ये #penguinsena असा हॅशटॅग देखील वापरला आहे.
आदित्य ठाकरे यांनी सोमवारी मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईतील विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली. सरकारला टोलनाके बंद करा, असे आव्हान देत ते म्हणाले होते की, सरकार मुंबईकरांची लूट करत आहे. तसेच मुंबईकरांवर डबल जबाबदारी का? डबल कर का आकारला जात आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाहोता.आता या मुद्द्यावरून मनसेने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहणार असा आक्रमक पवित्रा आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते की, 'मुंबईचे इस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे हे दोन्ही एमएमआरडीएने बीएमसीकडे हस्तांतरीत करुन दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या खर्चातून या दोन्ही हायवेच्या मेनटनन्सचा खर्च केला जातो. हे जर होत असेल जर मुंबईकरांच्या करातून त्यांच्या पैशातून जर या दोन प्रमुख रस्त्यांचे मेनटेनन्स होत असेल तर अजूनही तिथे टोलनाका, होर्डिंगचा सर्व पैसा महापालिकेकडे जात नाही. हा पैसा एमएसआरडीसीकडे का जात आहे?', असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला होता.
COMMENTS