मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ः ‘शासन आपल्या दारी’द्वारे चार हजार कोटींचे वाटप शिर्डी | नगर सह्याद्री सर्वसामान्यांना आपल्या कामासाठी हेलपाटे मारा...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ः ‘शासन आपल्या दारी’द्वारे चार हजार कोटींचे वाटप
शिर्डी | नगर सह्याद्री
सर्वसामान्यांना आपल्या कामासाठी हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून ‘शासन आपल्या दारी’ ही योजना हाती घेतली. आज शिर्डीत बारावा कार्यक्रम असून, यामध्ये विक्रम अशा २४ लाख ४८ हजार लाभार्थ्यांची नोंदण झाली आहे. तसेच या लाभार्थ्यांना तीन हजार ९८२ कोटी रूपयांचे साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन सांगितले. लोकसहभागातून एखादी योजना किती यशस्वी ठरते, याचे देशातील उत्तम उदाहरण म्हणून ‘शासन आपल्या दारी’ या योजनेकडे पहावे लागेल, असेही ते म्हणाले. शिर्डीतील यशस्वी कामाबद्दल त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील व खा. सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, प्रशासनाचे कौतूक केले. विरोधक रोज सकाळी प्रार्थना करतात की एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री पद जाऊद्या. आधी म्हणाले सरकार पडेल. मात्र सरकार पाडू-पाडू म्हणून त्यांचे ज्योतिषी संपले आणि अजित पवार इकडे आले. सरकारच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत. आम्हाला किती पाण्यात बघाल?. झोपता उठता तुम्हाला आम्ही दिसतो. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, जनता आमच्या सोबत आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
शासन आपल्या दारी कार्यक्रम गुरुवारी शिर्डी येथील काकडी गावात झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, आमदार राम शिंदे, अशुतोष काळे, बबनराव पाचपुते, सत्यजित तांबे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, वैभव पिचड, स्नेहलता कोल्हे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्यासह पदाधिकारी, सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्राचा राज्य सरकारला पाठिंबा आहे. राज्याच्या सर्व मागण्या मान्य होतात. शिर्डीत जगभरातून साईभक्त येतात. समृद्धी महामार्गामुळे शिर्डीचा विकास होणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट भाव मिळाला पाहीजे म्हणून सरकारचे उपाय सुरु आहेत. दिवसा वीज देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे शिंदे म्हणाले. कुठल्याही शासकीय हॉस्पिटलमध्ये आता एकही रुपया भरावा लागणार नाही. मोफत उपचार मिळणार आहेत. कुटुंबाच्या आजाराजी काळजी आता सरकार घेणार आहे. सर्व अटी-शर्ती आता काढून टाकल्या आहेत. ५ लाखांपर्यंत खर्च सरकार करणार आहे. महात्मा फुले योजनेअंतर्गत ही सेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम कार्यक्रमापुरता मर्यादित नाही. वर्षांचे ३६५ दिवस हे सरकार जनतेच्या दारी जात राहणार आहे. हे लोकांपर्यंत जाणारे सरकार आहे. हे बंद दाराआड काम करणारे सरकार नाही, तर हे फेस टू फेस बोलणारे सरकार आहे. हे फेसबुकवर बोलणारे सरकार नाही. आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो आहोत. पुढेही पोहचत राहणार आहोत. निश्चितपणे जनतेच्या जीवनात परिवर्तन करणारे हे सरकार आहे. नवीन सरकारने आणलेल्या योजना अनेकांपर्यंत पोहचत आहेत. १ रुपयात सुरू केलेली पीक विमा योजना शेतकर्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. राज्यात सध्या पावसाने ब्रेक घेतला आहे. मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो अशी परिस्थीती येऊ नये. दुर्दैवाने दुष्काळाची परिस्थिती आलीच तर पीक विम्याचा फायदा शेतकर्यांना होईल. राज्यात आज एक मजबूत सरकार आहे. तरीही काही लोक दिवसा स्वप्न पाहतात. सांगतात की, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. हो आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे आहे, पण त्या खुर्चीच्या रक्षणासाठी आमचे त्याकडे लक्ष आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे वाकड्या नजरेने बघणार्यांना जागा दाखवू, असा इशाराही यावेळी फडणवीसांनी दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, भाजपसोबत आल्याने आम्ही शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांपासून किंचितही दूर गेलो नाही. या देशात महापुरुषांचा आदर केलाच पाहिजे. त्याबद्दल कुणीही बेताल वक्तव्य करू नये, याची खबरदारी आमच्याकडून घेतली जात आहे. मोदींशिवाय देशात दुसरा पर्याय नाही, म्हणूनच त्यांच्या विरोधात खिचडी तयार झाली आहे. जगाने मोदींचे नेतृत्व मान्य केले आहे. त्यामुळे काहींच्या पोटात दुखायला लागले, असे म्हणत इंडिया आघाडीवर टीका केली. तसेच तुम्ही महायुतीला साथ द्या, तुमच्या विश्वसाला तडा जाऊ देणार नाही, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दरम्यान, मुख्यमंत्री बदलाच्या वावड्यांवर विरोधकांचा उपमुख्यमंत्री पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.
नगरकरांना भावल्या पंतप्रधानांच्या योजना ः पालकमंत्री विखे
मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आधीच सरकार वेगात काम करत होते. अजित पवार यांच्या येण्याने ट्रिपल इंजिन सरकार जास्त वेगात काम करत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांत नगर जिल्हा कायम आघाडीवर राहिला आहे. आजच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमातही प्रशासनाने चांगले काम केल्याने मोठ्या संख्येने नागरिक येथे उपस्थित आहेत, अशा शब्दांत पालकमंत्री तथा महसूलमंत्री विखे पाटील यांनी नगर जिल्ह्याच्या कामगिरीचे कौतुक केले.जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे काही निर्णय घेणे आवश्यक आहे. ज्या शेतकर्यांकडे पाणी आहे, त्यांनी चारा उत्पादन करावे आणि त्यांच्याकडून चारा सरकारने विकत घ्यावा. बियाणे सरकार त्यांना मोफत देईल, असे धोरण घेण्याची गरज आहे. यावर्षी नगर जिल्ह्यात पाच पट शेतकर्यांनी विमा घेतला. मागच्या वेळी २ लाख होते, यावर्षी ११ लाख शेतकर्यांनी विमा घेतला. एक रुपयात पीक विमा योजनेचे हे यश आहे. लम्पी आजारात शेतकर्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले. शंभर कोटी रुपये नुकसान भरपाई पशुपालकांना दिली. केंद्र सरकारच्या योजनांत नगर जिल्हा कायम आघाडीवर राहिला आहे. यानंतरही शासन आपल्या दारी कार्यक्रम संपणार नाही. पुढील टप्प्यात तालु्यात जाऊन नागरिकांशी संवाद साधण्याचे काम सरकार करणार असल्याचे विखे म्हणाले.
‘शासन आपल्या दारी’मुळे विद्यार्थ्यांचे हाल ः आ. तनपुरे
अहमदनगर जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामुळे दररोजच्या मार्गावरील एसटी बससेवा बंद करून नागरिकांना कार्यक्रमासाठी नेण्यासाठी पाठवण्यात आल्या. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसहित सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला असून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागली. पायी शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या गाडीतून शाळेत सोडले. शासन आपल्या दारी या शासनाच्या अतिरंजित उपक्रमामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचे, विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. विद्यार्थी शाळा, कॉलेजमध्ये जाण्यासाठी पायपीट करताना दिसले. कारण सर्व एस टी बसेस मुख्यमंत्री महोदयांच्या सेवेसाठी तैनात आहेत. यांच्याकडून कार्यक्रमासाठी गर्दी जमेना म्हणून खूप दुरून लोकं आणावी लागत आहेत, असे ऐकले. असो, त्यांना कार्यक्रमासाठी आणि भवितव्यासाठी शुभेच्छा! असं कॅप्शन टाकून तनपुरे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
COMMENTS