पारनेर आगारात केवळ ९ बस शिल्लक ः विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांना मोठा फटका पारनेर | नगर सह्याद्री- पारनेर आगारातील एकूण ४७ बसपैकी ३७ बस शिर...
पारनेर आगारात केवळ ९ बस शिल्लक ः विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांना मोठा फटका
पारनेर | नगर सह्याद्री-
पारनेर आगारातील एकूण ४७ बसपैकी ३७ बस शिर्डी येथे मुख्यमंत्र्यांसह मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या ‘शासन आपली दारी’ कार्यक्रमासाठी पाठवण्यात आल्या आहेत. पारनेर आगारात केवळ ९ बस शिल्लक राहिल्याने तालुयातील १३१ गावातील बस सेवा गुरुवारी विस्कळीत झाली. १६ ते १७ गावातील मुक्कामी बस सेवाही बंद पडली. सलग सुट्यांमुळे गावी आलेले आणि आता मुंबई, पुणे, नाशिक किंवा इतर जिल्ह्यात जाणार्या चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांना अपुर्या बस सुविधांचा फटका बसला.
एकीकडे सर्वसामान्यांसाठी शासन आपल्या दारी ही योजना राबवत असले तरी दुसरीकडे त्यांच्यामुळेच गैरसोय होत असल्याचा आरोप सोशल मीडियावर होत आहे. अनेक सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी याचा तीव्र निषेध करत सरकार नेमके कोणासाठी काम करत आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. शिर्डी जवळील काकडी विमानतळ परिसरात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम होत आहे. यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सुमारे ३० हजार लाभार्थी नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शासनाच्या वतीने थेट गावागावातून कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या शेकडो बसेसचा वापर करण्यात आला आहे. विविध आगारांमध्ये नियमित प्रवासी सेवा देताना यामुळे अडचणी आल्या आहेत. शालेय विद्यार्थी, नियमित प्रवास करणारे नोकरदार, व्यावसायिक आणि कामानिमित्ताने प्रवास करणार्या प्रवाशांचा विचार न करता सरकारने दबावाखाली एसटीच्या लालपरीला वेठीला धरल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व आगारातील मिळून ६०० बसेस शिर्डी कार्यक्रमासाठी आरक्षित असल्याने जिल्ह्यातील नियमित प्रवासी सेवा विस्कळीत होण्याची शयता आहे.
भाजप सरकारचा निषेध ः सचिन भालेकर
भाजप सरकारनेने स्वतःची वडिलोपार्जित मालमत्ता असल्याप्रमाणे एसटी महामंडळाच्या बस शिर्डी येथे कार्यक्रमाला नेल्या आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय, तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढता येणारे नाही. मी या सरकारचा जाहीर निषेध करतो, असे ‘परिवर्तन’चे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी म्हटले.
COMMENTS