मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत.
मुंबई / नगर सह्याद्री -
मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर आता ईडीही त्याच्यावर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ईडीने किशोरी पेडणेकर यांच्यावर दाखल गुन्ह्यांची संपूर्ण यादी मागवली आहे. त्यामुळे त्यामुळे आता ईडी देखील त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.
कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ५ ऑगस्ट रोजी किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. बॉडी बॅग खरेदीत ५० लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासोबत मुंबई महानगर पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या या गुन्हासंबंधीतीची माहिती ईडीने मागवली आहे. त्यामुळे ईडी देखील किशोरी पेडणेकरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेत कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. कोरोनाच्या काळात निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला असून त्यात किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास करत महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या घरी छापेमारी केली होती. त्यामुळेच किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होईल, अशी अपेक्षा होती. अशा परिस्थितीत आता त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कोरोनाच्या काळात मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला होता. यासोबतच महागड्या किमतीत औषधे खरेदी करून बॉडी बॅग खरेदीतही घोटाळा करण्यात आला. ईडीने म्हटले आहे की मुंबईतील मृत कोविड रुग्णांना घेऊन जाण्यासाठी वापरली जाणारी बॉडी बॅग २,००० रुपयांऐवजी ६,८०० रुपयांना विकत घेण्यात आली होती. तत्कालीन महापौरांच्या सूचनेवरून हे कंत्राट देण्यात आल्याचेही ईडीने म्हटले आहे. विशेष म्हणजे किशोरी पेडणेकर या कोरोनाच्या काळात मुंबईच्या महापौर होत्या. या प्रकरणाची ईडीकडून कसून चौकशी केली जात आहे.
COMMENTS