शरद पवार यांचे अत्यंत विश्वासून जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी केला आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासून जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी केला आहे.
त्यांच्या या दाव्याची राजकीय वर्तुळात उलट सूलट चर्चा सुरू झाली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांना विचारणा करण्यात आली. यावर रोहित पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे.
सांगलीच्या स्थानिक नेत्याच्या वक्तव्याकडे लक्ष देऊ नका, जयंत पाटील शेवटपर्यंत राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. कोण काय बोलले याकडे दुर्लक्ष करायचे. ज्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडली त्यांचा स्वत:च्या कार्यकारणीवर विश्वास राहिला नाही, असा टोलाही रोहित पवार यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
भाजपची नेहमी पक्ष फोडाफोडीची प्रवृत्ती राहिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून त्यांना किती यश आले हे माहित नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांचे फोटो लावून संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. ती त्यांची रणनीती असू शकते, लोकांचा प्रतिसाद काय आहे हे महत्वाचे आहे,
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनीही खासदार संजयकाका पाटील यांच्या दाव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या पक्षात फूट नाही आणि जयंत पाटील कुठेही जाणार नाहीत. अजित पवार आमचे आहेत. त्यांची मते वेगळी असल्यानेच ते तिकडे गेलेत, सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांच्यासह काही आमदारांसह भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून दोन गट निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. काही निष्ठावंत नेते आजही शरद पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. जयंत पाटील हेही शरद पवार यांच्यासोबत आहेत. ते आता भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील यांनी जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. सांगलीतील मिरज येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना संजय काका पाटील यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. या कार्यक्रमाला भाजपचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.
COMMENTS