केंद्र सरकारने निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर नाशिक आणि पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच नाफेडने खरेदी केलेला कांदाही बाजारात आणला जाणार आहे. या निर्णयानंतर राज्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत आंदोलन सुरू केले आहे.
देशातील कांद्याच्या वाढत्या भावामुळे केंद्र सरकारने निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर नाशिक आणि पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांनी आजपासून बेमुदत बंद पुकारला आहे.
याशिवाय नाशिकच्या येवल्यातही शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला. मनमाड-येवला रस्त्यावरील बाजार समितीसमोर रास्ता रोको सुरू करण्यात आला असून शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या या रास्ता रोकोमुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंदला नगर जिल्ह्यातील किसान सभेने पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारच्या सततच्या शेतकरी विरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी एकत्र येण्याच केलं आवाहन किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केले आहे.
COMMENTS