अहमदनगर / नगर सह्याद्री अहमदनगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. तहसीलदारांवर हल्ला झाल्याचा प्रकार घडल्याचे समजते. त्यानंत...
अहमदनगर / नगर सह्याद्री
अहमदनगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. तहसीलदारांवर हल्ला झाल्याचा प्रकार घडल्याचे समजते. त्यानंतर संतप्त जमावाने हल्लेखोरांवर चाल केल्याने वातावरण काही काळ चांगलेच तणावाचे बनले होते. ही धक्कादायक घटना नेवासे येथे घडली आहे. जाणून घेऊयात सविस्तर प्रकार -
नेवासा फाटा येथील तारा पार्क, साई तेज कॉलनी, फाटके कॉम्पलेक्स व शांतीनगर वसाहतीतील वहिवाटीचा रस्ता खुला करुन मिळावा या मागणीसाठी येथील संतप्त महिला-पुरुषांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले.
या रास्ता रोको आंदोलनानंतर उपस्थित संतप्त महिला - पुरुष नागरिकांनी वहिवाटीचा रस्ता त्वरीत खुला करण्याची मागणी तहसीलदार संजय बिरादार यांच्याकडे केली. यावेळी उपस्थित असलेले कामगार तलाठी ए.बी.दिघे यांनी सदर पंचनाम्याचे वाचन आंदोलकांसमोर करुन सदरील रस्त्याच्या कागदपत्रांची पडताळणी करुन पाहणी केली जाईल तो पर्यंत हा रस्ता नागरीकांची अडचण म्हणून तात्पुरता खुला करुन देत आहोत असे पंचनाम्यात नमुद केले.
यावेळी आनंदित झालेल्या आंदोलकांनी विजयाच्या घोषणा देत तारकंपाउंड व रस्त्यावर असलेल्या पत्र्यांच्या टपर्या काढून टाकण्यासाठी धाव घेतली.त्यामुळे चिडलेल्या घुले यांनी तहसीलदार बिरादार यांनी हा रस्ता खुला करून देण्याच्या निर्णयाची लेखी आम्हाला द्या अशी मागणी तहसिलदार बिरादार यांच्याकडे केली असता तहसिलदारांनी ही मागणी अमान्य केली.
यामुळे घुले बंधूंचा राग अनावर झाला्. त्यातील तिघांनी तहसिलदार बिरादार यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. यावेळी आंदोलनातील जमावाने घुले बंधूवर हल्ला चढवला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
परंतु अपुरे पोलीस संख्याबळ असल्याने हाणामार्या होत किरकोळ दगडफेक झाली. याप्रकरणी तहसीलदार संजय बिरादार यांनी नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS