निघोज | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील निघोज येथील जगप्रसिद्ध रांजणखळग्यात (कुंड) पडल्याने वाशिम जिल्ह्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे....
निघोज | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील निघोज येथील जगप्रसिद्ध रांजणखळग्यात (कुंड) पडल्याने वाशिम जिल्ह्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी आहे की पदमाबाई शेषराव काकडे ही महिला (वय ५५ वर्ष, रा. मोरेगव्हाण ता.कारंजा जिल्हा वाशिम) येथून कुटुंबासहीत मंगळवारी निघोज येथील मंळगंगा देवीच्या दर्शनासाठी जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात आली होती.
हात पाय धुण्यासाठी ती खडकाळ परिसर असलेल्या रांजणखळगे परिसरात धोक्याच्या ठिकाणी गेली. मात्र शेवाळलेल्या खडकावर पाय पडल्याने तीला तीचा तोल सावरता आला नाही. ती तशीच रांजणखळग्यात वाहून जाउन तीचा मृत्यू झाला. यावेळी तीचा जावई महेंद्र शहादेव औताडे यांनी बराच प्रयत्न केला. मात्र सासुला वाचवण्यास त्यांना अपयश आले.
निघोज येथील हेडकॉन्स्टेबल डहाळे हे घटना समजताच तातडीने कुंड परिसरात आले. कुंडाला पाणी जास्त असल्याने तसेच कुंड निघोज व टाकळी हाजी ता.शिरुर परिसरातील लोकांनी शोध मोहीम हाती घेउन सदर महिला कुंडात कुठे सापडते का याचा शोध घेतला. मात्र या महिलेचा शोध घेण्यास अपयश आले. हेडकॉन्स्टेबल डहाळे यांनी उपनिरीक्षक उगले व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना याबाबत तातडीने माहिती दिली. तसेच डावा कुकडी कालवा अधिकार्यांशी संपर्क करुण पाण्याचा प्रवाह कमी करण्यासाठी सुचना केली.
मात्र लगेच पाणी कमी होणार नाही यासाठी किमान बारा ते पंधरा तास लागतील असे समजल्यावर रात्री आठ वाजता शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात देवदर्शन तसेच पर्यटनासाठी लोक राज्यातून मोठ्या संख्येने येत असतात. हातपायी धुण्यासाठी मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज ग्रामस्थ, मुंबईकर मंडळ व ग्रामपंचायत यांनी मंदीराजवळ नळपाणी पुरवठा द्वारे व्यवस्था केली आहे. असे असून लोक जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात धोक्याच्या ठिकाणी जाऊन धोका पत्करून मृत्यूच्या दाढेत जात असून या परिसरात कुणी जाउ नये अशाप्रकारे सुचना फलक या ठिकाणी आहेत.
तसेच जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसर पाहण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पातवे तयार केला असून यासाठी सरकारने एक कोटी रुपये खर्च केला आहे. असे असूनही लोक जवळ जातात व मृत्यूला सामोरे जातात याविषयी ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली असून कुंडामधील पाण्याचा प्रवाह, खडकावरील शेवाळ यापासून धोका ओळखून पर्यटक व भावीक यांनी जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात धोक्याच्या ठिकाणी जाउ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS