पुण्यामधील एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधीही फूट पडलेली नाही.
मुंबई । नगर सह्याद्री
अजित पवार यांनी भाजपशी युती करून शिंदे-भाजपा सरकारला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते हे काही अजित पवार यांच्या सोबत सामील झाले तर काही शरद पवार यांच्यासोबत आहेत. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी आज केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पुण्यामधील एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधीही फूट पडलेली नाही. पक्षातील काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्याबाबत आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली आहे. अजित पवार हे पक्षाचे वरिष्ठ नेते असल्याने त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. परंतु शरद पवार हेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत.
पक्षावरील दाव्यासाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासमोर पक्ष फुटल्याने आव्हान असून सुप्रिया सुळे यांनी वक्तव केल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाल्याने काँग्रेसमध्ये खरंच फूट पडली का? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित झाला आहे.
COMMENTS