ग्रामस्थांमध्ये भीती | कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी गोरेगाव | नगर सह्याद्री गोरेगाव येथील सुतकडा परिसरात बिबट्याचा नेहमीच वावर असतो. ...
ग्रामस्थांमध्ये भीती | कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी
गोरेगाव | नगर सह्याद्री
गोरेगाव येथील सुतकडा परिसरात बिबट्याचा नेहमीच वावर असतो. येथे काही दिवसापूर्वी बिबट्याने पशुधनावर हल्ला करून शेळी व कुत्र्यांना फस्त केले होते. यामुळे ग्रामस्थ धास्तावले असल्याने वनविभागाच्या अधिकार्यांनी परिसरात पिंजरा लावला होता. बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हा बिबट्या पिंजर्यात जेरबंद झाला. ग्रामस्थांनी बिबट्या पिंजर्यात जेरबंद झाल्याचे दिसताच वन विभागाला माहिती दिली. बुधवारी वन कर्मचार्यांनी पिंजर्यातील बिबट्याला गाडीत टाकून नेले.
गोरेगाव येथील सुतकडा व परिसरात अनेक वर्षांपासून बिबट्यांचा वावर आहे. मोठे लपन क्षेत्र, दाट झाडी व भोवताली दरी असल्याने या ठिकाणी बिबट्यांचे अस्तित्व आहे. आत्तापर्यंत या भागात चार ते पाच बिबटे पकडण्यात वनविभागाला यश आले. गेल्या पंधरा दिवसापासून सुतकडा येथील अशोक तांबे यांच्या घराजवळ बिबट्याचा वावर होता. त्याने पशुधनावर हल्ला चढवत शेळ्या व कुत्रे फस्त केले होते. भीमाजी सावळेराम तांबे यांच्या घराजवळही या बिबट्याचा वावर होता. या भागात नेहमीच बिबट्याचा वावर असल्याने कायमस्वरूपी पिंजरा लावण्यात आला आहे. बिबट्या पिंजर्यात जेरबंद होत नसल्याने पिंजरा अन्यत्र हलविण्याची मागणी केली होती.
यानुसार वन विभागाने पिंजरा हलवून त्यात भक्ष्य ठेवल्यानंतर बिबट्या बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास जेरबंद झाला. बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश मिळाले असले तरी या भागात आणखी बिबट्यांची संख्या असण्याची शयता व्यक्त होत आहे. त्यामुळे बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी अॅड. प्रवीण तांबे यांनी केली आहे. बिबट्याच्या हालचालीकडे लक्ष ठेवून वनविभागाला माहिती पुरवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी मदत केली.
अशोक तांबे, प्रदीप तांबे, संदीप तांबे, गौरव तांबे, प्रथमेश पानमंद, अभिजित तांबे, गोविंद तांबे, राजू पानमंद, तुकाराम तांबे, स्वप्नील नरसाळे, अमोल तांबे, सुतकडा मित्र मंडळ, गोरेगाव कणीक साबळे, वनपाल -भाळवणी, सुर्यवंशी-वनमजूर आदी उपस्थित होते.वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी के. एस. साबळे, पी. व्ही. सोनवणे, वनरक्षक एन. व्ही. बडे, आय. एफ. शेख यांनी बिबट्या जेरबंद होण्यासाठी कारवाई केली. या बिबट्याला पारनेर येथील वन विभागाच्या कार्यालय परिसरात पिंजर्यात ठेवले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर माळशेज घाटात सोडून देण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
COMMENTS