कोपरगाव / नगरसह्याद्री : चिता ही मेलेल्या माणसांना जाळते, तर चिंता ही जिवंत माणसांना जाळते. आजकाल प्रत्येक माणूस डोक्यावर चिंतेचे ओझे घेऊन...
कोपरगाव / नगरसह्याद्री : चिता ही मेलेल्या माणसांना जाळते, तर चिंता ही जिवंत माणसांना जाळते. आजकाल प्रत्येक माणूस डोक्यावर चिंतेचे ओझे घेऊन जगताना दिसतो. आपण चांगल्या गोष्टीऐवजी दु:खाचा जप करत मानसिक तणावाखाली जगतो आहोत.
त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. जीवन फार सुंदर आहे. जास्तीच्या अपेक्षा व हव्यास न ठेवता परमेश्वराने जे दिले आहे त्यात समाधान मानून आनंदाने जगले पाहिजे, असे प्रतिपादन कोपरगावच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी केले.
कोपरगाव येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अध्यात्मिक ध्यान केंद्रात मंगळवारी (२९ ऑगस्ट) राजयोगिनी ब्रह्माकुमारी प. पू. वासंतीदीदी (नाशिक) व प. पू. सरलादीदी (कोपरगाव) यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला. रक्षाबंधन सणानिमित्त प. पू. वासंतीदीदी व व प. पू. सरलादीदी यांनी सर्व उपस्थित मान्यवरांना राखी बांधून प्रसादाचे वाटप केले.
यावेळी शहीद सुभेदार सुनील रावसाहेब वलटे (रा. दहेगाव बोलका) यांची वीरपत्नी मंगला वलटे, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, ॲड. अशोकराव टुपके, ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्ष सुधा ठोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्षाबंधन सणानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने कोपरगाव येथे उभारलेली ब्रह्माकुमारीज परमात्मा अनुभूती भवनची वास्तू कोपरगावच्या वैभवात भर टाकणारी आहे. हे केंद्र सर्वांना ऊर्जा देत आहे.
रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या अतूट नात्याची ग्वाही देणारा, बहीण-भावातील प्रेम दर्शवणारा सण आहे. ब्रह्माकुमारी परमात्मा अनुभूती भवनमध्ये आल्यावर आपल्या सर्वांना बहीण-भावाच्या अतूट प्रेमाची, परस्परांमधील स्नेहपूर्ण नात्याची जाणीव होते असेही त्या म्हणाल्या.
ब्रह्माकुमारी प. पू. वासंती दीदी व प. पू. सरलादीदी यांनी रक्षाबंधन सणाचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट केले. सर्वांनी आध्यात्मिक ज्ञान आत्मसात करून ईश्वरी मार्गाने मार्गक्रमण करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS