अहमदनगर | नगर सह्याद्री गेल्या ४ वर्षापासून पुणे रोड कायनेटिक चौकातील रेल्वे उड्डाण पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी खा. सुजय विखे यांच्याकडे...
अहमदनगर | नगर सह्याद्री
गेल्या ४ वर्षापासून पुणे रोड कायनेटिक चौकातील रेल्वे उड्डाण पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी खा. सुजय विखे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन सुधारित रेल्वे स्टेशन उद्घाटन प्रसंगी नगरसेवक मनोज कोतकर यांनी खा. सुजय विखे पाटील यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले.
रेल्वे उड्डाणपूल खूप जुना झाला आहे. पुलाची दुरावस्था झाली असून या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. त्याचे कठडे तुटलेले आहेत. तसेच हा पुल अरुंद असल्यामुळे वाहतुकीस अडथळा होवून अपघात होत आहेत. तर या पुलावर वारंवार अपघात होत आहे. त्यातच या पुलावरून एक डंपर जात असताना थेट या पुलाखाली पडून अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
तसेच या पुलाच्या आजूबाजूला मोठी नागरी वसाहत असून त्यांना देखील या पुलापासून धोकाच आहे. केडगाव येथील रेणुका मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून नवरात्र उत्सवादरम्यान भाविक याच पुलावरून देवी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात. तसेच कायनेटीक चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होती. याकरिता सदरील रेल्वे उड्डाण पुल नविन बांधून त्याची लांबी कायनेटीक चौकाच्या पुढे नेणे आवश्यक आहे.
नविन उड्डाणपुलामुळे या परिसरातील वाहतुक खालून जाण्यास मदत होईल. औरंगाबाद पुणे जाणार्यांना उड्डाण पुलावरून जाता येईल. आणि यातून वाहतुक कोंडी व अपघात टाळण्यास मदत होईल. या सर्व बाबींचा विचार करून जुना रेल्वे उड्डानपुल पाडून त्याच ठिकाणी कोठी रस्त्यावरील उड्डाणपुलासारखा नविन रेल्वे उड्डाणपुल कायनेटीक चौकापुढे पर्यंत करण्याच्या दृष्टिने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी खासदार सुजय विखे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
COMMENTS