लोणी | नगर सह्याद्री भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना ’हर घर तिरंगा’ अभियाना बरोबरच देशभक्तीपर कार्यक्रमातून ‘हर मन तिरंगा’ ...
लोणी | नगर सह्याद्री
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना ’हर घर तिरंगा’ अभियाना बरोबरच देशभक्तीपर कार्यक्रमातून ‘हर मन तिरंगा’ करण्यासाठी शासकीय अधिकारी आणि पदाधिका-यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभुमीवर नगर जिल्ह्यातील प्रत्येक गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी अधिकारी आणि कर्मचार्यांना दिल्या आहेत.राज्यात ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांना सुरूवात झाली असल्याकडे लक्ष वेधून ‘माझी माती माझा देश’ हे अभियान सुरू झाले आहे.
गावातील मूठभर माती संकलीत करून अमृत कलश संकलीत करण्याचे आवाहनही मंत्री विखे पाटील यांनी केले. प्रशासन आणि नागरीकांनी एकत्रितपणे गावातील ग्रामपचायत कार्यालयाजवळ शिलालेख उभारणी करायची असून या शिलालेखावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश स्थानिक शहीद वीरांची नावे आणि शहीद वीरांना नमन करणारा मजकूर असावा. यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रशासनाने पुढाकार घेण्याबाबतच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
मागील वर्षी ‘हर घर तिरंगा’ अभियान संपूर्ण जिल्ह्याने उत्साहपूर्ण वातावरणाने यशस्वी केले होते त्याच पध्दतीने यंदाही दि.१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक नागरीकाच्या घरावर तिरंगा झेंडा फडकविण्याचे आवाहन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, या अभियानात जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय सहकारी, खासगी संस्था, सेवाभावी संस्था, संघटना यांच्या सहभागातून या अभियानाने ‘हर मन तिरंगा’ करण्यासाठी सर्वानी पुढाकार घेण्याचे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
COMMENTS