ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे एक प्रकरण समोर आले आहे. गुरुवारी दिवसभरात पाच रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
मुंबई / नगर सह्याद्री -
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे एक प्रकरण समोर आले आहे. गुरुवारी दिवसभरात पाच रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला. उपचाराअभावी या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप रुग्णाच्या कुटुंबीयांनी केल्याने रुग्णालय परिसरात आक्रोश करून गोंधळ घातला. या सर्व प्रकारावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
शहरातील गरीब रुग्णांसोबतच जिल्ह्यातील रुग्णही सर्वप्रथम ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे पहिले जाते. मात्र काल (10 ऑगस्ट) या रुग्णालयात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. गुरुवारी रुग्णालयात एकाच दिवसात पाच रुग्णांचा मृत्यू झाला.
उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याची माहिती मिळताच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात पोहोचून प्रशासनाला धारेवर धरले. रुग्णांच्या नातेवाईकांनी आरडाओरडा सुरू केला. मात्र रुग्णालय प्रशासनाने मृत्यू झालेले रुग्ण गंभीर असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्यातील शिवाजी रुग्णालयाबाबत तक्रारी येत होत्या. आज एका महिलेने फोन केला की, तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत, परंतु रुग्णालय प्रशासन त्याची योग्य काळजी घेत नाही. काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी दवाखान्यात गेल्यावर मी सुन्न झालो होतो, तळपायाची आग मस्तकात गेली.
त्या महिलेचा पती हा जनरल वॉर्ड मध्ये उपचार घेत होता.तेथे पोहचलो असता,संबंधित रुग्णाला ICU मध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याचे समजले.तिकडे गेल्यावर कळाले की त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.तरी तेथील डॉक्टर्स आणि प्रशासन त्या रुग्णावर ५ तास उपचार करत होते.थोडक्यात रुग्ण आधीच दगावला होता परंतु रुग्णालय प्रशासनाने याची काहीही माहिती त्या महिलेला दिली नव्हती.उलट ५ तास त्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे ते सांगत होते.याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना जाब विचारला असता,त्या प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टर लोकांची बोलती बंद झाली.
मेलेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे दाखवून त्या रुग्णाच्या पार्थिवाला ICU मध्ये नेण्यात येते.तिथे आधीच गंभीर रुग्ण उपचार घेत असतात.या गंभीर रुग्णांना,दगावलेल्या रुग्णामुळे संसर्ग होऊन त्या जिवंत असणाऱ्या रुग्णांचा देखील जीव अजूनच धोक्यात टाकण्यात येतो.आज दिवसभरात या रुग्णालयात ५ रुग्ण दगावले आहे. असे संतप्त ट्वीट आव्हाडांनी केले.
COMMENTS