सरकारच्या निर्णयाविरोधात अमोल कोल्हे आक्रमक झाले असून शेतकरी विरोधी धोरणाविरोधात दोन महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लादणे म्हणजे शेतकऱ्यांच्या हातातील माती हिसकावून घेण्यासारखे असल्याचा आरोप करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात अमोल कोल्हे आक्रमक झाले असून शेतकरी विरोधी धोरणाविरोधात दोन महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.
अमोल कोल्हे यांनी कांद्याबाबत केंद्र सरकारच्या निर्णयावर निशाणा साधला आहे. आगामी लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महागाई आटोक्यात आणण्याच्या नावाखाली तात्पुरत्या बंदोबस्ताच्या नावाखाली शेतकऱ्यांचा बळी दिला जात असल्याचा गंभीर आरोपही खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.
तसच,'कांद्यातून दोन रुपये हाती पडतील अशा भोळी भाबडी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली असता केंद्र सरकारने शेतकऱ्यांची स्वप्न धुळीस मिळण्याचे पाप केलेय. या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात दोन महामार्गा रोखण्याचा इशारा अमोल कोल्हेंनी दिलाय.
दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात अमोल कोल्हे यांनी काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवले होते. या पत्राद्वारे त्यांनी केंद्र सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा, ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची माती होत आहे. यावेळी त्यांनी केंद्राचे हे धोरण शेतकरीविरोधी असल्याची टीकाही केली.
COMMENTS