नवी दिल्ली / वृत्तसंस्था - १५ वर्ष वयाच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कार ठरत नाही, असं स्पष्ट मत दिल्ली उच्च न्यायालयाने नोंद...
नवी दिल्ली / वृत्तसंस्था -
१५ वर्ष वयाच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कार ठरत नाही, असं स्पष्ट मत दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवत मोहम्मद के (बदलेले नाव) यांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. लाईव्ह लॉ या कायद्याविषयक वृत्तस्थळाने हे वृत्त दिले आहे.
१५ नोव्हेंबर २०१६ रोजी ट्रायल कोर्टाने याप्रकरणात मोहम्मद के यांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती. ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा आदेश कायम ठेवत याचिका फेटाळून लावली आहे. “आम्हाला असे आढळून आले की पीडिता १५ वर्षांची असून त्याची पत्नी आहे. त्यामुळे पीडितेसोबतचे शारीरिक संबंध बलात्कार ठरत नाही. त्यामुळे आम्ही या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता करत आहोत”, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
डिसेंबर २०१४ मध्ये १५ वर्षीय मुलगी, तिची आई आणि मोहम्मद के त्यांच्या मूळ गावी बिहार येथे गेले होते. तेथे ते एका लग्नात ते उपस्थित राहिले. ते लग्न झाल्यानंतर मोहम्मद आणि मुलीने लग्न केले. परंतु, हे लग्न त्यांनी घरच्यांपासून लपवून ठेवले. दरम्यान, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये मोहम्मद के यांनी मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. मोहम्मद के हा मुलीच्या मोठ्या बहिणीचा नवरा आहे. परंतु, त्याने या पीडितेशीही लग्न केलं. लग्नानंतर मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या आईने पोलीस ठाणे गाठले. मुलीने आईच्या संमतीशिवाय मोहम्मद याच्यासह लग्न केले होते. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. पोस्को कलम ५ (१), कलम ६ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, हे प्रकरण ट्रायल कोर्टात गेले. मोहम्मद यांच्यावर बलात्काराचा आरोप करत याप्रकरणी सुनावणी झाली. परंतु, लग्नाआधी मोहम्मद यांनी आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले नसल्याची साक्ष मुलीने कोर्टात दिली. तिच्या या साक्षीवरून १५ वर्षे वयाच्या पत्नीसह शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कार ठरत नाही, असं नोंदवत मोहम्मद के यांना निर्दोष सोडण्यात आले आहे.
काय आहे मुस्लिमक पर्सनल लॉ?
मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार, १५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुस्लिम मुलीला तिच्या पसंतीच्या व्यक्तीशी विवाह करण्याची परवानगी आहे. अशा लग्नामध्ये लैंगिक संबंध गुन्हा मानला जात नाही, असं बार अॅण्ड बेंचने त्यांच्या वृत्तात म्हटलं आहे.
COMMENTS