अहमदनगर | नगर सह्याद्री- नऊ लाख रूपये रोकड असलेली बॅग दुचाकीवरील अज्ञात चोराने पळवून नेल्याच्या गुन्ह्यात फिर्याद देणारा कामगारच चोर निघाला...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
नऊ लाख रूपये रोकड असलेली बॅग दुचाकीवरील अज्ञात चोराने पळवून नेल्याच्या गुन्ह्यात फिर्याद देणारा कामगारच चोर निघाला आहे. कोतवाली पोलिसांनी सीसीटीव्ही व तांत्रिक बाबींचा तपास करून या गुन्ह्याचा छडा लावत नऊ लाखांची रोकड हस्तगत केली. शरद रावसाहेब पवार (वय ४० रा. द्वारकालॉनशेजारी, नेप्तीफाटा) असे चोरीचा बनाव करणार्याचे नाव आहे.
हरिभाऊ बंडुजी शिंदे (रा. पुणे) यांनी कांदा चाळीवर काम करणार्या मजुरांना पैसे देण्यासाठी त्यांच्याकडील कामगार पवार याला नऊ लाख रूपयांची रोकड दिली होती. पवार पुणे येथून आल्यावर आयुर्वेदिक कॉलेज रस्त्यावरून जात असताना सोमवारी (दि. १४) दुचाकीवरून आलेल्या चोराने त्याच्याकडील पैशाची बॅग पळविल्याची फिर्याद त्याने कोतवाली पोलीस ठाण्यात दिली.
घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पिंगळे यांच्यासह गुन्हे शोध पथकाला घेऊन घटनास्थळाला भेट देऊन आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. नागरिकांना विचारपूस केली असता अशी कोणती घटना त्या परिसरात घडली नसल्याचे तपासात समोर आले. तपासादरम्यान फिर्यादीवर शंका आल्याने पवार याची कसून चौकशी केली. त्याने स्वतःच मालकाची रोकड चोरल्याची कबुली दिली. पैशांची आवश्यकता असल्याने नऊ लाख रूपये नातेवाईकांकडे लपवून ठेवल्याचे सांगितले.निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक पिंगळे, उपनिरीक्षक प्रविण पाटील, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, रियाज इनामदार, अभय कदम, संदीप थोरात, अमोल गाढे, कैलास शिरसाठ, सागर मिसाळ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, अतुल काजळे, याकुब सय्यद यांच्या पथकाने ही कारवाई केली.
COMMENTS