बंगळुरू | वृत्तसंस्था चांद्रयान ३ ने २३ ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केलं. विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर ...
बंगळुरू | वृत्तसंस्था
चांद्रयान ३ ने २३ ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केलं. विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आले आहे. १४ दिवसांसाठी ही मोहीम चालणार आहे. रोव्हर विक्रम लँडरला जी माहिती पाठवेल ती विक्रम लँडर पृथ्वीवर पाठवणार आहे. चौदा दिवसानंतरही विक्रम लँडर आणि रोव्हरचा मुक्काम चंद्रावरच राहणार आहे.
चंद्रावर जेव्हा परत सूर्य उगवेल त्यावेळी या दोन्हीचं काम पुन्हा सुरु होऊ शकते. तसे घडल्यास भारतासाठी ती देखील आनंदाची बातमी ठरणार आहे. चांद्रयान ३ पृथ्वीवर १४ दिवसांनी परत येणार का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. मात्र तसे काही होणार नसून, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर दोन्हीही चंद्रावरच राहणार आहेत. चांद्रयान ३ चे एकूण वजन ३९०० किलो आहे. प्रोपल्शन मॉड्यूलचे वजन २१४८ किलोग्रॅम आणि लँडर मॉड्यूलचे वजन १७५२ किलो आहे. त्यात २६ किलोच्या रोव्हरचा समावेश आहे.
प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाची रासायनिक रचना कशी आहे, ते तपासणार आहे. चंद्राची माती आणि खडक यांचे परीक्षणही करणार आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा पहिला देश ठरला आहे. त्यामुळे विक्रम लँडरमधून बाहेर आलेले प्रज्ञान रोव्हर जो अभ्यास आणि निरीक्षण करेल ते संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे असणार आहे.
प्रमुख योगदान असलेले पाच...
चांद्रयान-३ प्रकल्पाच्या यशस्वी लँडिंगमागे ५ शास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची होती. इस्त्रोचे प्रमुख ५७ वर्षीय एस. सोमनाथ तथा श्रीधर पणिककर सोमनाथ यांनी संपूर्ण चांद्रयान-३ मोहिमेचे नेतृत्व केले. ते एअरोस्पेस अभियांत्रिकीशी संबंधित तज्ज्ञ आहेत.जानेवारी २०२२ मध्ये ते इस्त्रोचे अध्यक्ष झाले. त्यापूर्वी ते विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधअये संचालक होते. ते केरळमधील एका मल्याळी कुटुंबातील आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (बंगळुरू) येथून मास्टर्स केले आहे.पी. वीरामुथुवेल २०१४ मध्ये इस्त्रोमध्ये रुजू झाले.
सप्टेंबर २०१९ मध्ये चांद्रयान-२ मोहीम अयशस्वी झाल्यानंतर पी. वीरमुथुवेल यांना चांद्रयान-३ मिशनचे प्रकल्प संचालक बनवले. वीरमुथुवेल मूळचे तामिळनाडूमधील विल्लुपुरमचे आहेत. कल्पना कालहस्ती चांद्रयान-३ मिशनच्या सहयोगी संचालक असून, त्या आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील आहेत. इस्त्रोमध्ये नोकरी मिळवणे हे कल्पना यांचे बालपणीचे स्वप्न होते. चेन्नईतून बीटेक केल्यानंतर त्या शास्त्रज्ञ म्हणून इस्त्रोमध्ये रुजू झाल्या.
एस. मोहना कुमार हे चांद्रयान-३ प्रकल्प मोहिमेचे संचालन संचालक आहे. ते विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ असून २५ वर्षांहून अधिक काळ अंतराळ क्षेत्रात काम करत आहे. ते वनवेब इंडिया-२ मिशनचे प्रकल्प संचालकही राहिले आहेत. एम. शंकरन यांचे चांद्रयान-३ च्या डिझाईनमध्ये मुख्य योगदान आहे. ते यू आर राव स्पेस सेंटरचे संचालक आहेत. त्यांनी १९८६ मध्ये तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
रोव्हर दोन तासांनी बाहेर...चांद्रयान ३’ ही इस्रोची मोहीम यशस्वी झाल्याने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर २ तास २६ मिनिटांनी रोव्हर लँडरमधून बाहेर आले. रोव्हर म्हणजे सहा चाक असणारा रोबोट आहे. रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर चालला की तिथल्या पृष्ठभागावर अशोक स्तंभ आणि इस्रोच्या खुणा उमटणार आहेत. रोव्हरच्या चाकांवर अशोक स्तंभ आणि इस्रोचे चिन्ह कोरले आहे. चांद्रयानाचे सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर उडालेली धूळ खाली बसण्यास दोन तासांपेक्षा जास्त कालावधी गेला. धूळ असताना रोव्हर बाहेर आले असते तर कॅमेरांवर धूळ बसली असती तसेच आतील उपकरणाचे नुकसान होऊ शकले असते. चांद्रयान १ मोहिमेवेळी चंद्रावर पाण्याचे अंश आढळले आहेत. आता रोव्हर प्रज्ञान काय माहिती पाठवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर या दोहोंवर चार मशीन्स आहेत. ऊन असेल तेव्हा रोव्हरला सौर उर्जा मिळणार आहे.
चंदामामा दूर के नही, टूर के...; मोदीब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी होत या क्षणाचा आनंद घेतला. त्यांनी वैज्ञानिकांचे अभिनंदन करताना म्हटले, हा क्षण भारताच्या ताकदीचा आहे. हा भारतातील नव्या ऊर्जेचा, नव्या विश्वासाचा, नव्या चेतनेचा क्षण आहे. अमरत्वाच्या काळात अमृताचा वर्षाव झाला. आपण पृथ्वीवर एक प्रतिज्ञा घेतली आणि ती चंद्रावर साकार केली. अंतराळात नव्या भारताच्या नव्या उड्डाणाचे आपण साक्षीदार आहोत. ‘अब चंदामामा दूर के नही, तो भविष्य मे चंदामामा टूर के होगे’
COMMENTS