बंगळुरु / वृत्तसंस्था : भारतानं अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत...
बंगळुरु / वृत्तसंस्था :
भारतानं अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या कष्टाचं सो नं झालं आहे. चांद्रयान २ मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेलं अपयश चांद्रयान ३ च्या माध्यमातून पुसून काढण्यात आलं आहे.
भारतीय यान यशस्वीपणे चंद्रावर उतरवण्याचा महत्त्वाचा टप्पा आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी पार पडला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला. चांद्रयानाचं लँडिंग यशस्वी होणारच असा ठाम विश्वास भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) व्यक्त केला होता तो खरा करुन दाखवला आहे.
इस्त्रोनं सतीश धवन प्रक्षेपण केंद्र श्रीहरी कोटा येथून १४ जुलै रोजी चांद्रयान ३ चे प्रक्षेपण केलं होतं. त्यानंतर आज म्हणजेच २३ ऑगस्टपर्यंत प्रत्येक पातळीवर भारताला यश मिळालं होतं. यावेळी भारतानं ऑर्बिटर न पाठवता प्रॉपल्शन मॉड्यूल पाठवलं होतं. त्यामध्ये देखील अपेक्षेपेक्षा जास्त इंधन शिल्लक राहिले. या इंधनाचा उपयोग करून हे मॉड्यूल चंद्राभोवती पुढील किमान सहा महिने फिरत राहून पृथ्वीचा अभ्यास करेल.
पंतप्रधान मोदी म्हणाले...
“माझ्या प्रिय कुटुंबियांनो, जेव्हा आपण आपल्या डोळ्यांदेखल असा इतिहास बनत असताना पाहतो तेव्हा जीवन धन्य होतं. अशी ऐतिहासिक घटना राष्ट्रजीवनाची चिरंजीव चेतना होऊन जाते. हा क्षण अविस्मरणीय आहे. हे क्षण अभूतपूर्व आहे.हे क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे. हा क्षण नव्या भारताचा जयघोषाचा आहे. हा क्षण अडचणींच्या महासागराला पार करण्याचा आहे. हा क्षण १४० कोटी लोकांच्या सामर्थ्याचा आहे. हा क्षण भारतात नवी ऊर्जा, नवा विश्वास, नव्या चेतानाचा आहे. हा क्षण भारताच्या उदयमान भाग्याच्या आवाहानाचा आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हरचा समावेश असलेल्या लँडर मॉड्युललाही अपेक्षित कक्षेत (२५ बाय १३४ किलोमीटर) पोहोचवण्यात इस्रोच्या शास्त्रज्ञांना यापूर्वीच यश आलं होतं. विक्रम लँडरच्या लँडिंगची सर्व प्रक्रिया लँडरवरील संगणकाच्या नियंत्रणाखाली पार पडली. त्यासाठी आवश्यक आज्ञावली बेंगळुरू येथील इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्कमधून (इसट्रॅक) लँडरकडे पाठवण्यात येत होत्या. बेंगळुरूजवळील ब्याललु येथील डीप स्पेस नेटवर्कच्या साह्याने लँडरशी थेट संपर्क साधून त्यावरील सर्व सेन्सर, कॅमेरा आणि इंजिनांची सातत्याने कसून तपासणी होत होती.
'मी माझ्या मुक्कामापर्यंत पोहोचलो आणि तुम्ही पण''
चांद्रयान-3 नं चंद्रावर पोहोचताच इस्रोला खास मेसेज पाठवला आहे. इस्रोने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. इस्रोने ट्वीट करत म्हटलं आहे की, ''चांद्रयान-3 मिशन : भारतीय, मी माझ्या मुक्कामापर्यंत (चंद्रावर) पोहोचलो आणि तुम्ही पण - चांद्रयान-3''. भारताचं चांद्रयान-3 चंद्राच्या कुशीत पोहोचलं आहे. भारताने जणू चंद्रच कवेत घेतला, अशी भावना आज प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे.
चांद्रयान २ च्या मोहिमेत अपयश आल्यानंतर चांद्रयान ३ च्या मोहिमेत बदल करण्यात आले होते. चांद्रयान ३ ला लँडिंगसाठी जागा निवडण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे. याशिवाय चांद्रयान मोहिमेत सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांनी देखील चांद्रयान मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला होता.
लँडिंगनंतर आता काय होणार?
- धूळ ओसरल्यानंतर विक्रम सुरू होईल आणि कम्युनिकेट करेल.
- त्यानंतर रॅम्प उघडेल आणि प्रज्ञान रोव्हर रॅम्पवरून चंद्राच्या पृष्ठभागावर येईल.
- रोव्हरची चाके चंद्राच्या मातीवर अशोक स्तंभ आणि इस्रोच्या लोगोची छाप सोडतील.
- विक्रम लँडर प्रज्ञानचा आणि प्रज्ञान रोव्हर विक्रमचा फोटो काढतील. ते हे फोटो पृथ्वीवर पाठवतील.
COMMENTS