अहमदनगर / नगर सह्याद्री - राज्यात नावलौकिक असलेल्या व शंभर वर्षांची परंपरा असलेल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची वादग्र...
अहमदनगर / नगर सह्याद्री -
राज्यात नावलौकिक असलेल्या व शंभर वर्षांची परंपरा असलेल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची वादग्रस्त नोकरभरती अखेर रद्द होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांचा राजीनामा कालच मंजूर करण्यात आला. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच दिनांक 24 ऑगस्ट रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी संस्थेच्या सचिवांना पत्र पाठवून तसे कळवले आहे.
जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सचिव जे. डी. खानदेशे यांच्याकडे दिला होता.
नगर सह्याद्रीचा दणका
जिल्हा मराठा शिक्षण संस्थेतील या वादग्रस्त नोकर भरती बाबत व भरतीत झालेल्या गैरव्यवहाराबाबत सर्वप्रथम नगर सह्याद्रीने आवाज उठवला या पाठोपाठ विश्वस्तांनी देखील तक्रारी केल्या. याबाबत सातत्याने पाठपुरावा आणि वस्तुस्थिती मांडण्याचे काम नगर सह्याद्रीने केले. अखेर या सर्व प्रयत्नांना यश येऊन सदरची भरती प्रक्रिया रद्द करण्याच्या निर्णयावर विद्यापीठाला यावं लागलं आहे. आता संस्थेच्या वतीने नव्याने होणारी भरती प्रक्रिया पारदर्शी होणार किंवा कसे याकडे देखील नगर सह्याद्रीचे लक्ष असणार आहे. दरम्यान सदर भरती बाबत सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल आणि ही प्रक्रिया रद्द करण्याच्या निर्णयासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल नगर सह्याद्रीच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या जिल्ह्यातील विविध महाविद्यायामध्ये 47 प्राध्यापकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार, अनियमिता झाल्याचा आरोप संस्थेच्या 14 विश्वस्तांनी केला होता.
ही भरती प्रक्रिया रद्द करावी, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, राज्यपाल, शिक्षण सचिव यांच्याकडे तक्रार केली होती.
दरम्यानच्या काळात अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी संस्थेचे सचिव जे. डी. खानदेशे यांच्याकडे राजीनामा दिला. संस्थेच्या विश्वतांची शुक्रवारी (दि.25) बैठक झाली. नंदकुमार झावरे यावेळी गैरहजर होते. त्यामध्ये अध्यक्ष झावरे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.
दरम्यान, संस्थेच्या सचिवांना विद्यापीठाने भरती प्रक्रियेबाबत पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाविद्यालयाचे व्यवस्थापन हे त्या महाविद्यालयातील कर्मचारी वर्गाची नियुक्ती व शिस्त विषयक प्राधिकरण आहे. सबब, भरती प्रक्रिया अथवा निवड प्रक्रिया राबवणे अथवा रद्द करणे ही व्यवस्थापनाच्या अखत्यारीतील बाब असल्याचे कळवले आहे.
नोकर भरती रद्द करण्याबाबत संस्थेचे विश्वस्त मंडळाने तक्रार केली होती. त्यामुळे विद्यापीठाचे पत्र पाहता संस्थेच्या विश्वस्त मंडळाकडून सदर भरती रद्द होणार असून नव्याने प्रक्रिया राबवली जाणार यात आत्ता शंका राहिलेली नाही.
COMMENTS