महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात विहीर खोदण्याच्या कामासाठी आलेल्या ११ मजुरांना कंत्राटदारांनी साखळ्यानी बांधून ठेवल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात विहीर खोदण्याच्या कामासाठी आलेल्या ११ मजुरांना कंत्राटदारांनी साखळ्यानी बांधून ठेवल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी त्या सर्व ११ मजुरांची सुखरूप सुटका केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत दोन कंत्राटदारांसह चार जणांना अटक केली आहे.
कंत्राटदारांद्वारे झालेल्या अत्याचाराची घटना मजुरांनी पोलिसांना सांगितली. त्यांनी सांगितले की, त्यांना रोज १२ तास काम करायला सांगायचे. यादरम्यान त्यांना एक रुपयाही दिला जात नव्हते. आणि जेवणही त्यांना एकदाच दिले जायचे.
उस्मानाबादच्या ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामसवाडी आणि वाखारवाडी या गावात दोन-तीन महिन्यांपूर्वी कंत्राटदारांनी विहिर खोदण्यासाठी मजुरांना तैनात केले होते. यावेळी सर्व मजुरांना बंधक बनवून त्यांच्यावर रोज अत्याचार करायचे. त्यातील एक मजूर कसा तरी पळून जाण्यात यशस्वी झाला. हिंगोली जिल्ह्यात पोहोचताच त्याने स्थानिक पोलिस ठाण्यात जाऊन ठेकेदारांविरोधात तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर हिंगोली पोलिसांनी उस्मानाबादच्या ढोकी पोलिसांशी संपर्क साधला. सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत म्हणाले- 'पोलीस पथक वाखारवाडी गावात पोहोचले तेव्हा त्यांना पाच मजूर विहिरीत काम करत असल्याचे दिसले. चौकशी केल्यावर पोलिसांना कळले की मजुरांना १२ तास काम करायला लावले होते. ते पळून जाऊ नये म्हणून रात्री त्यांना साखळ्यानी बांधून ठेवले होते.'
या मजुरांना दररोज सकाळी सात वाजल्यापासून विहिरीचे काम करण्यासाठी पाठवण्यात आले, तेथे त्यांनी १२ तास काम करून घ्यायचे. सर्व ११ मजुरांवर उपचार सुरू असून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पाठवण्याची व्यवस्थाही करण्यात येत आहे.
रविवारी पोलिसांनी कंत्राटदार संतोष जाधव आणि कृष्णा शिंदे यांच्यासह चार जणांना अटक केली. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७० (व्यक्तींची तस्करी), ३६७ (अपहरण), ३४६ (चुकीच्या पद्धतीने बंदिवासात ठेवणे) आणि ३२४ (धोकादायक शस्त्रांनी दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS