महाभारत मालिकेत शकुनी मामाची भूमिका करणारे अभिनेता गुफी पेंटल यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
महाभारत मालिकेत शकुनी मामाची भूमिका करणारे अभिनेता गुफी पेंटल यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत होते सुप्रसिद्ध अभिनेत्री टीना घई यांनी यांनी याची माहिती दिली आहे, मात्र आता अभिनेता गुफी पेंटल आपल्यात नसल्याने संपूर्ण सिनेजगतात शोककळा पसरली आहे. आज या अभिनेत्याचे निधन झाले असून यांच्या पार्थिवावर दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बीआर चोप्रा यांच्या प्रसिद्ध ऐतिहासिक शो 'महाभारत'ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या शोमधील प्रत्येक पात्राने चाहत्यांच्या हृदयात खूप महत्त्वाचे स्थान निर्माण केले होते. या कलाकारांमध्ये गुफी पेंटलच्या नावाचाही समावेश आहे. गुफी पेंटलने या शोमध्ये शकुनी मामाची भूमिका साकारली होती. आजही जेव्हा जेव्हा शकुनी मामाच्या अभिनयाची चर्चा होते तेव्हा गुफी पेंटलचे नाव घेतले जाते.
त्यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब होत होती. दरम्यान, गुफी पेंटलचा पुतण्या हितेनने एका मीडिया संस्थेला माहिती देताना सांगितले की, वयोमानानुसार अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्या गुफी पेंटलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. चाहत्यांसह सिनेसृष्टीतील अनेक तारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
गुफी पेंटल यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, ते १९८० च्या दशकात हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त काही टीव्ही मालिकांमध्ये दिसले. अभिनयाच्या जगात पाऊल ठेवण्यापूर्वी ते इंजिनियर होते. बीआर चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेतून त्यांना ओळख मिळाली.
COMMENTS