दक्षिण त्रिपुरामध्ये एका अल्पवयीन मुलीवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
दक्षिण त्रिपुरामध्ये एका अल्पवयीन मुलीवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी २१ वर्षांचा असून त्याने फेसबुकच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला त्याच्या पूर्व गोकुळपूर येथील घरातून अटक केली. या घटनेतील अन्य दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
उदयपूरचे उपविभागीय दंडाधिकारी निरुपम दत्ता यांनी सांगितले की, 'मुख्य आरोपीने तरुणीला टेपानिया इको पार्कमध्ये भेटण्यासाठी बोलावले. ती तिथे आली तेव्हा तिने नकार देऊनही त्याने मुलीचे काही फोटो क्लिक केले. आपल्याला ब्लॅकमेल केले जात असल्याचे मुलीच्या लक्षात येताच तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपी मुलाने मुलीला जबरदस्तीने जंगलात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. यात आरोपीच्या साथीदारांनीही त्याला साथ दिली. घरी परतत असताना या तिघांनी पीडितेला राजारबाग परिसरात कारमधून फेकून दिले आणि पळ काढला.'
पीडितेने तिच्या घरी पोहोचून कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली, त्यानंतर आरकेपूर महिला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान असे समोर आले की, पीडित तरुणी आणि आरोपी सहा महिन्यांपासून फेसबुकवर मित्र होते. यादरम्यान आरोपीने पीडितेपासून आपली ओळखही लपवली होती.
या घटनेचा निषेध करताना त्रिपुरा महिला आयोगाच्या अध्यक्षा बर्नाली गोस्वामी म्हणाल्या की, 'तरुणांचा एक भाग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना फसवत असल्याचे आपण पाहत आहोत. आपण शाळा-कॉलेजात जाणाऱ्या मुलींना सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्रीच्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली पाहिजे.'
उपविभागीय दंडाधिकारी दत्ता म्हणाले की, 'या प्रकरणाचा तपास सुरू असून फरार आरोपींना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.'
COMMENTS