महाराष्ट्रातील सध्याचे सरकार बेकायदेशीर असून येत्या काळात त्यांच्या आदेशाचे पालन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले.
मुंबई / नगर सह्याद्री -
सरकार आणि जनता यांच्यात तेढ निर्माण केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे वक्तव्य समोर आले आहे. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार बेकायदेशीर असून येत्या काळात त्यांच्या आदेशाचे पालन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, 'सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मला वाटते की हे सरकार बेकायदेशीर आहे आणि कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने या सरकारचे आदेश पाळले तर ते बेकायदेशीर असेल. आगामी काळात अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते.
संजय राऊत यांच्या विरोधात मुंबईतील नाका पोलिस ठाण्यात आयपीसी कलम ५०५ (१) (बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आणि जनता यांच्यातील तेढ वाढवल्याच्या आरोपावरून राऊत यांच्यावर हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राज्यातील सध्याचे सरकार बेकायदेशीर असून अधिकाऱ्यांनी त्याचे आदेश पाळू नयेत, असे संजय राऊत यांनी एका निवेदनात म्हटले होते.
यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र प्रकरणी दिलेल्या निर्णयात उद्धव ठाकरेंना फ्लोअर टेस्टला सामोरे जावे लागले नाही आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला, असे सांगितले होते. अशा स्थितीत न्यायालय राजीनामा रद्द करू शकत नाही, तसेच जुने सरकार बहाल करू शकत नाही. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी उद्धव सरकारला फ्लोअर टेस्ट करण्यास सांगणे हा चुकीचा निर्णय असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आपला विजय सांगत आहे.
COMMENTS