टीडीएम' हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार असून हा चित्रपट ९ जून २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
भाऊराव कर्हाडे दिग्दर्शित 'टीडीएम'ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळत नाही, हा चित्रपट सर्वाधिक चर्चेचा विषय ठरल्याने मराठी चित्रपटांची गळचेपी होत असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटावर झालेल्या अन्यायावर चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते यांनी उठवलेला आवाज थेट प्रेक्षकांनी चित्रपटाला न्याय मिळवून देण्यासाठी बुलंद केला.
अन्यायाविरुद्ध उठलेला आवाज अखेर सार्थ ठरला असून नुकतीच या चित्रपटाबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 'टीडीएम' हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार असून हा चित्रपट ९ जून २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कर्हाडे यांच्या 'टीडीएम' या चित्रपटात भाऊरावांनी दोन नव्या चेहऱ्यांना मोठ्या पडद्यावर चमकण्याची संधी दिली. शिवाय, चित्रपटाचा विषय वेगळ्या धाटणीचा असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. प्राईम टाईम नसल्यामुळे आणि अनेक ठिकाणी शो न झाल्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहातून काढून टाकण्यात आला असला, तरी आता चित्रपटाचे निर्माते भाऊराव कर्हाडे यांनी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करून प्रेक्षकांसमोर आणण्याचा निर्णय घेतला आहे.
चित्रपटाविषयी भाऊराव कऱ्हाडे म्हणाले, “मी सर्वप्रथम जनतेचे, प्रेक्षकांचे आणि माध्यमांचे आभार मानतो. खूप मोठी घटना होती ही, यामध्ये सर्व जनता, प्रेक्षक आणि मित्रपरिवार पाठीशी उभे राहिले त्यामुळे नवी उमेद मिळाली, आणि म्हणून ‘टीडीएम’ येत्या ९ जूनला प्रदर्शित होतोय. एक कलाकार म्हणून जेव्हा एवढा सपोर्ट मिळतो त्यामुळे बळ वाढलंय. बऱ्याच दिग्गज मंडळींनी ही फोन करून खंबीर साथ दिली, बळ दिल. तसेच सिनेसृष्टीतील बऱ्याच दिग्गज कलाकारांनी ही स्वतः फोन करून खंबीर साथ दिली, पाठिंबा दर्शविला, खचून न जाता उभं राहण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्या या प्रेमाच्या शब्दापोटी मी आज उभा आहे. मी मायबाप प्रेक्षक आणि सर्वांचाच आभारी आहे.
COMMENTS