पिंपरी चिंचवडमधील एका नामांकित शैक्षणिक संस्थेजवळ मेफेनटरमाईन सल्फेट आणि गांजा विक्रीचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
पिंपरी चिंचवडमधील एका नामांकित शैक्षणिक संस्थेजवळ मेफेनटरमाईन सल्फेट आणि गांजा विक्रीचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
जिममध्ये जास्त वेळ घालवण्यासाठी, फिट बॉडी दाखवण्यासाठी आणि सेक्स पॉवर वाढवण्यासाठी महाविद्यालयीन मुले मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन खरेदी करत असल्याचे पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी उघड केले आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने वायसीएम रुग्णालयाजवळ केलेल्या कारवाईत रवी चंद्रकांत थापा (वय ३२) याला ताब्यात घेऊन त्याची चाैकशी केली.
या छाप्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या ९५ बाटल्या, ६४२ ग्रॅम गांजा आणि २००० रुपये रोख जप्त केले. रवी चंद्रकांत थापा हा वायसीएम रुग्णालयाजवळील एका नामांकित संस्थेतील विद्यार्थ्यांना मेफेनटरमाईन सल्फेट आणि गांजा पुरवत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी रवी चंद्रकांत थापा याच्याविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात (कलम २७६, ३३६, ३२८ आणि एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS