प्रेयसीच्या दशक्रिया विधीच्या दिवशी प्रियकराने घेतला फास ः ‘वेगळेच काहीतरी’ असल्याची चर्चा शरद झावरे | नगर सह्याद्री - तालुयातील देसवडे य...
प्रेयसीच्या दशक्रिया विधीच्या दिवशी प्रियकराने घेतला फास ः ‘वेगळेच काहीतरी’ असल्याची चर्चा
शरद झावरे | नगर सह्याद्री -
तालुयातील देसवडे येथील प्रेमी युगुलोने घरच्यांकडून प्रेमाला विरोध होत असल्याने १२ दिवसाच्या कालावधीतच मुलीने शेततळ्यात तर मुलीच्या दशक्रिया विधीच्या दिवशीच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन मुलाने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी पारनेर पोलिसात सध्या तरी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पारनेर तालुयातील मुळा नदीच्या कडेला असलेले देसवडे येथे ही घटना घडली. या दोघांचे गावातच प्रेमाचे सुत जुळले. मुलीच्या घरच्यांना ही गोष्ट माहिती होताच त्यांनी तिच्याकडून तिचा मोबाईल काढून घेतला. त्यामुळे प्रियकराचा विरह तिला सहन न झाल्याने ती घर सोडून निघून गेली. याप्रकरणी तिच्या घरच्यांनी तरुणी बेपत्ता असल्याची खबर पारनेर पोलिस ठाण्यात नोंदवली. या प्रकरणी संशय या तरुणावर असल्याने पारनेर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलवले. परंतु नंतर लगेच सोडूनही देण्यात आले. दोन दिवसांनी गावातील एका शेतळ्यामध्ये मुलीचा मृतदेह तरंगताना आढळुन आला. पारनेर पोलिसांनी पंचनामा व उत्तरीय तपासणी करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
गेल्या १० ते १२ दिवसात मोठ्या प्रमाणावर या प्रकरणी घडामोडी घडल्या. घटनेतील तरुणाला मोठा मानसिक त्रास झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मानसिक त्रासातून की मुलीच्या विरहामुळे त्याने आत्महत्या केली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान या घटनेतील तरुणाच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये स्थानिक तीन नावे असल्याची माहिती तपासी अधिकारी सहायक फौजदार बी. बी. भोसले यांनी दिली. यासबंधी कुणी फिर्याद दिली तर या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही पारनेर पोलिसांनी सांगितले आहे.
गावगुंडांनी प्रियकराला ब्लॅकमेल करत लिहून घेतली जमीन ..
देसवडेतील प्रेम कहाणीचे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्यानंतर ते मिटवायचे असेल तर स्थानिक गावगुंडांनी तुझ्या वडिलांच्या नावे असलेली एक एकर जमीन लिहून दे, अशी गळ प्रियकराला घातली. त्यानुसार प्रकरण मिटवण्याच्या नावाखाली गावगुंडांनी ही जमीन त्रयस्त व्यक्तीचे नावे खरेदी करून घेतली. त्याला मोठ्या प्रमाणात त्रासही दिला. प्रियकराने मुलीचे बरेवाईट झाल्यास मी पण आत्महत्या करेन, अशी धमकीही चौकशी दरम्यान टाकळी पोलिसांसमोर दिली होती. अखेर या मुलीच्या दशक्रिया विधीच्या दिवशी २८ एप्रिलला त्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. त्यामुळे या आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
तथ्य समोर येईल का?
देसवडे येथील १९ वर्षीय तरुणाने २८ एप्रिलला लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे ज्यांनी या प्रकरणात मयत तरुणाला त्रास दिला, त्या तिघांची नावे या चिठ्ठीत असल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा तपास करणारे तपासी अधिकारी सहायक फौजदार भोसले यांनी चिठ्ठी मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे पारनेर पोलीस तपास करणार का? तथ्य समोर येणे गरजेचे असून पोलीस कारवाई करणार का, असे सवाल देसवडे ग्रामस्थ करत आहेत.
जीव गेला दोघांचा तडजोड मात्र लाखांची?
देसवडे गावातील या प्रेमी युगुलांने प्रेमाच्या आणाभाका घेत सुखी संसाराची स्वप्ने रंगवपी असतानाच प्रेमाला दृष्ट लागली. कुटुंबियांच्या विरोधामुळे तरूणीने शेततळ्यात जीवनयात्रा संपवली. या प्रकरणात मध्यस्थांसह अनेकांनी तरुणाला त्रास दिल्याने त्रासाला कंटाळून व प्रेयसीने जीवनयात्रा संपविल्याने तिच्या दशक्रिया विधीच्या दिवशीच त्याने देसवडे गावातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपवली. ‘जीव गेला दोघांचा, तोडजोडी मात्र लाखांची’ अशी चर्चा देसवडे गावात आहे.
COMMENTS