शरद झावरे | नगर सह्याद्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची निवड १५ मे रोजी होणार असून, सभापती-उपसभापतिपदी वर्णी लागण्य...
शरद झावरे | नगर सह्याद्री
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची निवड १५ मे रोजी होणार असून, सभापती-उपसभापतिपदी वर्णी लागण्यासाठी अनेक मातब्बरांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्यावतीने सभापतिपद राष्ट्रवादी तर उपसभापतिपद शिवसेना (ठाकरे गट) यांना मिळू शकते.
नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके व माजी आमदार विजय औटी एकत्र आले. त्यांनी एकत्रितपणे लढवील्या गेलेल्या निवडणुकीत सर्व १८ जागा जिंकत भाजपचा पराभव केला. बाजार समिती सभापती, उपसभापतिपदासाठी वर्णी लागावी म्हणून अनेक संचालकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. येत्या १५ मे रोजी या निवडी होणार आहेत. तालुयात मानाचे व जबाबदारीचे समजले जाणारे पद मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाकडे जात अनेक संचालक साकडे घालत आहेत. माजी सभापती प्रशांत गायकवाड गेले काही वर्षापासून बाजार समितीच्या सभापतिपदावर काम करत आहेत. बाजार समिती महाराष्ट्रात नावारूपाला आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. याही वेळेस मीच या पदाचा दावेदार आहे? अशी चर्चा त्यांच्याबाबत ऐकावयास मिळत आहे. गंगाराम बेलकर, अशोकराव सावंत, बाबाजी तरटे, संदीप सालके यांचीही मोर्चेबांधणी चालू आहे.
उपसभापतिपद ठाकरे गटाकडे जाणार असल्यामुळे या गटाच्या निवडून आलेल्या पाचही संचालकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तालुयात एक वेगळेपन निर्माण करत गुरु-शिष्याची जोडी एकत्र आली. बाजार समितीचा सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून सभापती-उपसभापतिपदाची निवड करण्यासाठी विधानसभेचे माजी उपसभापती विजयराव औटी शिवसेना गोटातून कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
गेले अनेक वर्षात माजी आमदार विजयराव औटी यांच्या संघर्षाच्या -काळात सावलीसारखी साथ देणारे डॉ. श्रीकांत पठारे यांच्या सौभाग्यवती डॉ. पद्मजा पठारे सर्वाधिक मताधिय मिळवत निवडून आल्या आहेत. एक महिला चेहरा असलेल्या डॉ. पद्मजा पठारे औटी कुटुंबियाच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात. त्यांची उपसभापतिपदासाठी वर्णी लागू शकते, अशी चर्चा आहे. तसेच ठाकरे गटासोबत प्रामाणिक राहिलेले किसनराव सुपेकर यांच्या नावाचाही पर्यायी विचार होऊ शकतो, असे औटी समर्थकांकडून बोलले जाते. रामदास भोसले, शंकर नगरे हे देखील स्पर्धेत आहेत. येत्या दोन दिवसात आमदार नीलेश लंके व माजी आमदार विजयराव औटी याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.
COMMENTS