गीतांजली शेळके व स्मिता शेळके यांची बँकेच्या संचालकपदी निवड अहमदनगर | नगर सह्याद्री राज्यातील अग्रगण्य समजल्या जाणार्या जी एस महानगर बँकेच्...
गीतांजली शेळके व स्मिता शेळके यांची बँकेच्या संचालकपदी निवड
अहमदनगर | नगर सह्याद्री
राज्यातील अग्रगण्य समजल्या जाणार्या जी एस महानगर बँकेच्या संचालकपदी गीतांजली उदयराव शेळके आणि स्मीता गुलाबराव शेळके यांची नुकतीच निवड करण्यात आली. मुंबई शहराचे जिल्हा उपनिबंधक नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि बँकेच्या अध्यक्षा श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या दोघींचीही बिनविरोध निवड करण्यात आली. गितांजली या स्व. उदयराव शेळके यांच्या पत्नी तर स्मीता या स्व. गुलाबराव शेळके यांच्या कन्या व स्व. उदयराव शेळके यांच्या भगिनी आहेत. दोघींच्याही निवडीचे स्वागत होत आहे.
बँकेचे अध्यक्ष अॅड. उदयराव शेळके यांचे काही महिन्यांपूर्वी आजारपणात निधन झाले. त्यांच्या निधनाने बँकींग क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली होती. बँकेच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके यांनी नेटाने काम चालू ठेवले होते. उदयराव शेळके यांच्या निधनानंतर ठेवीदार, कर्जदार, सभासद यांचा बँकेवरील विश्वास तसूभरही कमी झाला नाही. बँकेच्या ठेवींमध्ये वाढ झाली आणि कर्जाची वसुली देखील मोठ्या प्रमाणात झाली. स्व. सॉ. गुलाबराव शेळके यांनी बँकेला आणि बँक कर्मचारी- अधिकार्यांना घालून दिलेली शिस्त आणि व्यवस्थापनाचे धडे आजही उपयोगी पडत असून त्यामुळेच बँकेवर ठेवीदारांचा आजही मोठा विश्वास असल्याचे प्रतिपादन बँकेचे कार्यकारी संचालक मंजुनाथा कांचन व उपाध्यक्ष भास्करराव कवाद यांनी सांगितले.
गितांजली शेळके व स्मीता शेळके या दोघींच्या निवडीने महानगर बँकेत पुन्हा एकदा ‘जी’, ‘एस’ राज्य सुरू झाले असून बँकेचा लौकीक वाढविण्यासाठी या दोघींच्या निवडीचा नक्कीच फायदा होणार असल्याचा विश्वास बँकेचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद यांनी व्यक्त केला. गितांजली शेळके व स्मीता शेळके या दोघींच्याही निवडीचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार, माजी मंत्री व काँंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांनी अभिनंदन केले आहे.
विश्वासाला पात्र ठरेल असे काम करु ः शेळके
बँकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब आणि अॅड. उदयदादा शेळके यांनी बँकेला आर्थिक शिस्त लावली. त्यामुळेच बँकेवर आजही सभासदांचा, ठेवीदारांचा मोठा विश्वास असल्याचे आज सिद्ध झाले आहे. बँकेवर आमच्या दोघींची झालेली निवड ही त्याचाच एक भाग असून आम्ही दोघी मिळून विश्वस्ताच्या भावनेतून हातात हात घालून काम करणार आहोत. सभासदांचा हित जपतानाच ठेवीदारांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता बँकेचे अधिकारी- कर्मचारी यांच्या सहकार्याने बँकेची वाटचाल अधिक गतीमान झाल्याचे यापुढच्या काळात दिसेल असा विश्वास नवनिर्वाचीत संचालिका गीतांजली शेळके व स्मीता शेळके यांनी ‘नगर सह्याद्री’शी बोलताना व्यक्त केला.
COMMENTS