मुंबई। नगर सहयाद्री - मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र, गेल्या आठवड्यापासून उ...
मुंबई। नगर सहयाद्री -
मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र, गेल्या आठवड्यापासून उष्णतेने कहर केला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान चाळीशीपार गेले आहे. अकोला येथे राज्यातील सर्वाधिक तापमान ४५.६ अंश नोंदवले गेले आहे. याशिवाय धुळे, परभणी वर्धा येथेही तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे.
विदर्भासह राज्यात रविवारी (ता.१४) देखील उष्णतेची लाट रहाणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील २-३ दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांनाही चांगलाच त्रास सहन करावा लागत असून उष्माघातामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेत नाशिक जिल्हयात दोन तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आडूळ बुद्रुक आणि नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कमाल तापमानाचा पारा हंगामातील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. उन्हाच्या झळांनी अंगाची लाही लाही होत आहे. याचा केवळ नागरिकांनाच त्रास होत नसून पिके, ऊस, फळबागाही करपू लागल्या आहेत. उन्हाचा चटका वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढून, जमिनीतील ओलावा कमी होत उन्हाळी पिकांना पाण्याचा ताण बसू लागला आहे. उन्हाच्या झळामुळे माणसांसह, जनावरे व कोंबड्यांनाही उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आहे.
COMMENTS